इराणी सोनसाखळी चोरटा कोल्हापूरातून अटकेत: ठाणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:48 PM2018-05-08T22:48:28+5:302018-05-08T22:48:28+5:30
वेगवेगळया प्रकारे ठाण्यासह राज्यभर फसवणूकीचा तसेच सोनसाखळी चोरीचा प्रकार करीत लुटमार करणा-या इराणी हैदरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे.
ठाणे : मुंबई, ठाणे, पुणे परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणा-या हैदर सरताज इराणी (३९, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळे, जि. कोल्हापूर) याला थेट कोल्हापुरातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली. त्याला ११ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे १९ गुन्हे दाखल आहेत.
मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे आणि ठाणे ग्रामीण आदी परिसरात हैदर आणि त्याच्या साथीदारांनी अनेक महिलांचे मंगळसूत्र हिसकावले आहेत. हा अट्टल सोनसाखळी चोरटा कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. त्या आधारे रणावरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार आणि शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने ५ मे रोजी त्याला जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले. जानेवारी २०१८ मध्ये ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील सुगंधा दळवी (६२) या महिलेची हैदरसह तिघांनी फसवणूक केली होती. ‘एका मारवाडी शेठला मुलगा झाला आहे, आशिर्वाद द्यायला चला,’ असे सांगून तिच्याकडून अडीच लाखांचे सुमारे नऊ तोळे सोन्यांचे दागिने हिसकावून पलायन केले होते. या गुन्ह्याचीही त्याने कबूली दिली आहे. सोनसाखळी हिसकावून पलायन करणे, पैसे मोजून देतो, अशी बतावणी करून लुटणे तसेच ज्येष्ठ महिलांकडून दागिने लुबाडणे असे वेगवेगळ्या प्रकारचे ठाण्यासह राज्यभर १९ गुन्हे केल्याची माहितीही तपासात उघड झाल्याचे रणावरे यांनी सांगितले. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करून त्याने निसटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ठाणे पोलिसांनी शिताफीने त्याला अखेर अटक केली.