सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या अट्टल इराणी चोरटयास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: April 10, 2024 09:38 PM2024-04-10T21:38:14+5:302024-04-10T21:38:24+5:30
वर्तकनगर पोलिसांची कामगिरी: दोन सोनसाखळयांसह माेटारसायकल हस्तगत
ठाणे: वर्तकनगर भागात चोरी करुन फरार झालेल्या अब्बास शहाजोर सय्यद (२४, रा. आंबिवली, कल्याण) या अट्टल इराणी चोरट्याला अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून ठाणेनगर आणि मुलूंड भागातून चोरलेल्या दोन सोनसाखळ्या आणि एक माेटारसायकल हस्तगत केली आहे.
वर्तकनगर भागात चोरी करुन पसार झालेले दोघेजण नवी मुंबईतील ऐराेली भागात येणार असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सागर गोंटे यांच्या पथकाने ८ एप्रिल २०२४ रोजी मानकोली गावापुढे ओहोळी गावाजवळील हायवेवर सापळा रचून एका दुचाकीवरील दोघांना दुचाकीसह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यापैकी एकजण तिथून पसार झाला तर ताब्यात घेतलेल्यास दुचाकीसह वर्तक नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीमध्ये अब्बास सय्यद असे त्याचे नाव असल्याची माहिती समोर आली.
अंगझडतीमध्ये त्याच्या पॅन्टच्या खिशातून काळे मणी असलेले सोन्याच्या मंगळसुत्राचे दोन तुकडे आणि एक सोनसाखळी मिळाली. त्यापैकी काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र हे या दोघांनी ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या परिसरातून एका महिलेच्या गळ्यातून खेचून घेतल्याची कबुली दिली. दुसरी सोनसाखळी त्यांनी कोणाकडून जबरीने चोरी केली, याचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी मुलुंड पोलिस ठाण्याच्या भागातून चोरल्याचीही माहिती तपासात समोर आली. अब्बास हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खडकपाडा, बदलापूर आणि नया नगर तसेच मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई केली असून त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.