मनसेचे जमील शेख खून प्रकरणातील इरफानची पोलीस कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:08 PM2021-04-05T23:08:26+5:302021-04-05T23:10:35+5:30
महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (२१) याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (२१) याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. इरफानला न्यायालयात आणले जाणार असल्यामुळे राबोडीतील एका गटाने गर्दी केली होती.
उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी दुपारी यूपीतील लखनौ भागातून ताब्यात घेतले आहे. त्याला सोमवारी (५ एप्रिल) पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. इरफान याला दोन लाख रुपयांची सुपारी ओसामा शेख याने दिल्याची माहिती चौकशीत समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने न्यायालयात दिली. जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी दिवसाढवळया ठाण्यातील राबोडीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जमील हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या इरफान याने त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी शाहीद शेख (२५, रा. राबोडी, ठाणे) हा इरफान सोबत होता. तोच मोटारसायकलही चालवित होता. त्याला या हत्याकांडानंतर २५ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली होती. यातील मुख्य सूत्रधार नेमकी कोण आहे? ओसामाची नेमकी भूमीका काय? त्याचबरोबर त्याचाही शोध घेणे बाकी आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक बाबींचा उलगडा होईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
* इरफान हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा रहिवाशी असून तो त्याठिकाणी शेतमजूरी करतो. तर ओसामा शेख हा राबोडीतील रहिवाशी असून तोही मुळचा गोरखपूरचा रहिवाशी आहे. तो कधी राबोडी तर कधी गोरखपूर असा वास्तव्यास असतो.
* राबोडीत मात्र तणाव
इरफान याच्या अटकेपासून राबोडीत मात्र तणावाचे वातावरण आहे. दरम्यानच्याच काळात राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या कार्यालयावर शनिवारी एका संतप्त जमावाने हल्ला केला होता. तर नजीब यांचे छायाचित्र असलेल्या एका रुग्णवाहिकेचीही या जमावाने तोडफोड केली होती. गेल्या तीन दिवसांपासून नजीब यांचे कार्यालय तसेच जमील शेख यांचे निवासस्थान असलेल्या भागात राबोडी पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात केली आहे. सोमवारीही इरफान याला ठाणे न्यायालयात आणले जाणार असल्यामुळे त्याठिकाणी एका गटाने मोठी गर्दी केली होती. मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नजीब हे मात्र आजारी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.