लोखंडी स्टॅन्डच्या कचराकुंड्या
By Admin | Published: October 12, 2016 04:04 AM2016-10-12T04:04:16+5:302016-10-12T04:04:16+5:30
चोरीला जाणाऱ्या स्टीलच्या (टाक्या) थुंकी तथा कचरा कुंड्यांचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात लोखंडी स्टॅन्डच्या कचरा कुंड्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : चोरीला जाणाऱ्या स्टीलच्या (टाक्या) थुंकी तथा कचरा कुंड्यांचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात लोखंडी स्टॅन्डच्या कचरा कुंड्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवताना, २५ स्टॅन्ड तयार करुन ते बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. या परिसरातून दररोज लाखो प्रवासी येजा करतात. तसेच या स्थानकाला प्राप्त झालेल्या दर्जानुसार त्याच्या सुरक्षेसह येथील स्वच्छतादेखील तितक्याच महत्त्वाचा विषय आहे. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कचरा टाकण्यासाठी तसेच थुंकण्यासाठी फलाट क्र मांक १ ते फलाट क्र मांक १० या स्थानकांवर तब्ब्ल ३५ ते ४० स्टीलच्या टाक्या रेल्वे प्रशासनामार्फत बसविल्या आहेत. मात्र, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील आवारात वावरणारे गर्दुल्ले हे रात्रीच्या वेळी चोरून घेऊन जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मागील एक- दोन वर्षात अंदाजे ३५ टाक्या चोरीला गेल्या आहेत. त्यालाच पर्याय म्हणून ठाणे रेल्वे प्रशासनाने ही पाऊले उचलण्यास सुरु वात केली आहे. त्यानुसार, लोखंडी स्टॅन्ड असलेल्या कचऱ्याच्या कुंड्या बसविण्याचा निर्णय घेऊन प्रायोगिक तत्वावर २५ लोखंडी स्टॅन्ड तयार केले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाप्रकारे १०० स्टॅन्ड बसवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.