इस्त्री करताना फुलली शायरी...
By admin | Published: April 13, 2017 03:05 AM2017-04-13T03:05:07+5:302017-04-13T03:05:07+5:30
‘मैंने माना की तुम उल्फत को सजा लिखोंगे, प्यार को आग और मोहब्बत को दगा लिखोंगे,
- मुरलीधर भवार, कल्याण
‘मैंने माना की तुम उल्फत को सजा लिखोंगे,
प्यार को आग और मोहब्बत को दगा लिखोंगे,
तुमने शैतान को तो शैतान लिखा जामी,
इस नये दौर के इन्सान को लिखोंगे...’
हा शेर आहे कल्याणचे जामी कल्याणवी या उर्दू शायरचा. मस्त कलंदर असलेले जामी कल्याणवी हे वयाच्या ६८ वर्षी दोन ते तीन लॉण्ड्रीत काम करून उदरनिर्वाह करत आहेत. शायरीचा त्यांना छंद आहे. कुवेत येथे १४ एप्रिलला होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण त्यांना मिळाले आहे. त्यामुळे ते गुरुवारी विमानाने कुवेतला उड्डाण करणार आहेत. ‘माझे आयुष्य पायी चालण्यात गेले. पण, शायरीमुळे विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली आहे,’ असे आवर्जून सांगतात.
जामी कल्याणवी हे त्यांचे शायरीतील नाव आहे. त्यांचे मूळ नाव इक्बाल गुलाम मुस्तफा शेख आहे. त्यांचा जन्म कल्याणमधील मुस्लीम मोहल्ल्यात झाला. आई गृहिणी होती. वडील मोलमजुरी करून कुटुंब सांभाळत होते. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी उर्दू माध्यमातून इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, त्यांची उर्दूवर चांगलीच पकड आहे. किशोरवयातच त्यांना काही सुचू लागले. सगळ्यात प्रथम त्यांनी एक ईश्वराच्या स्तुतीविषयी नातेपाक कलाम लिहिला. त्यानंतर, त्यांनी शायरीचा छंद जोपासला. तो जिवापाडच.
अविवाहित असलेले जामी हे पोटाला अन्न मिळेल इतकी कमाई करतात. मुस्लीम मोहल्ल्यातील तीन लॉण्ड्रीमध्ये कपड्यांना इस्त्री करतात. आलटूनपालटून काम केल्यावर त्यांना चार पैसे मिळतात. त्यात त्यांची गुजराण होते. ते कल्याणचे असल्याने त्यांनी शायरीतील नावही कल्याणवी असे धारण केले. जामी यांनी कोकण, खान्देश, बेळगाव, मध्य प्रदेशात आतापर्यंत १००पेक्षा जास्त मुशायऱ्यांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या शायरीचे लोक चाहते आहेत. कोणत्याही सद्य:परिस्थितीवर भाष्य करणारी त्यांची शायरीही उर्दू जाणकारांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. जामी यांना कल्याणच्या कार्यक्रमात कोणी बोलवले नाही, याची खंत त्यांना आहे. तसेच कल्याणमधील मुस्लीम संघटनांनी त्यांचा कधी गौरव केलेला नाही.
अन्सारी यांचा सत्कार
जामी यांचे शायर मित्र तस्लीम अन्सारी हे महाडला राहतात. अन्सारी यांचे विद्यार्थी जामी यांच्या शायरीचे चाहते आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थी हे कुवेतमध्ये कामाला आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळून अन्सारी यांचा एक सत्कार कुवेतला १४ एप्रिलला ठेवला आहे. या वेळी मुशायराही होणार आहे. या मुशायऱ्यासाठी जामी यांना आमंत्रित केले आहे. जामी यांची शायरी अन्सारी यांनाही आवडते. त्यांनी जामी यांना व्हिसा तसेच विमानाचे तिकीट काढून दिले आहे.