भातसा प्रकल्पाचे सिंचनाचा उद्देश केराच्या टोपलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:04+5:302021-03-16T04:41:04+5:30

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या ...

Irrigation purpose of Bhatsa project in Kera basket | भातसा प्रकल्पाचे सिंचनाचा उद्देश केराच्या टोपलीत

भातसा प्रकल्पाचे सिंचनाचा उद्देश केराच्या टोपलीत

Next

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या आरक्षणामुळे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण व भिवंडी या तालुक्यांसाठी आरक्षित असलेले सिंचनाचे पाणी उपलब्ध होत नल्याने येथील डावा-उजवा कालवा तिराची लांबी सीमित करण्याच्या शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना सिंचनाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कालव्यासाठी लागणारी वनविभागाची जमीन दहा वर्षांनंतरही संपादित न झाल्याने कालव्याचे काम रखडले आहे. भातसा प्रकल्पाचे सिंचनाचे उद्देश फोल ठरून उद्देशालाच केराची टोपली दाखवली आहे.

मुंबई महापालिकेची पाण्याची गरज विचारात घेता व पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने १९६१ मध्ये साजिवली गावाजवळ असलेल्या भातसा व चोरणा नदीच्या संगमावर भातसा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून २३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी सहा हजार ३२० हेक्टर क्षेत्र डावा तीर कालव्यावर व १६ हजार ६८० हेक्टर क्षेत्र उजवा कालव्यात सिंचन करणे प्रस्तावित होते. मुंबई महापालिकेस पिण्यासाठी पाणी देणे, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील डावा कालवाअंतर्गत येणाऱ्या व उजवा कालवाअंतर्गत येणाऱ्या गावातील २३ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी लाभ देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कालव्यांसाठी लागणाऱ्या वनजमिनीची मान्यता केंद्रीय पर्यावरण व वनविभागाने २००९ ला दिली. त्यासाठी २०१३ ला वनविभागाला ४६ कोटी अदा केले आहेत. त्यानंतर वेळोवेळी केंद्रीय पर्यावरण विभाग व वनविभागास अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव सादर करूनही अंतिम मंजुरी मिळत नसल्याने कालव्यांची कामे रखडली. मुंबईची तहान भागविण्यासाठी पाणी मुंबईला देण्यात येणार असल्याने ६७ किमी लांबीच्या उजवा कालव्याची १३ किमी लांबी शासनाने कमी केली. तर ५४ किमी लांबीच्या डावा तीर कालव्याची ३७ किमी लांबी कमी केली आहे. यामुळे सिंचनाचे क्षेत्र अवघे ९ हजार १९० हेक्टर क्षेत्रावर आले आहे. शासनाच्या ११ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार नाशिक येथील मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान अधिकाऱ्यांनी भातसा धरणातील पाणीसाठ्याबाबत पाहणी केल्यानंतर बिगर सिंचन वजा जाता पाणी उपलब्ध होत असल्याची खातरजमा केल्यानंतरच शासनाच्या परवानगीने कालव्यांची कामे सुरू करावीत, असे आदेश दिल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

----

मुंबई महापालिकेच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भातसा प्रकल्पाच्या नियोजनामध्ये सिंचनासाठी आरक्षित ठेवलेले पाणी मुंबईसाठी देण्यात येत असल्याने डावा -उजवा कालवा सीमित करण्यात आला आहे.

- आनंद नारायण उदमले, उपविभागीय अभियंता, भातसा धरण व्यवस्थापन विभाग

....

डावा-उजवा कालवा सीमित करण्याच्या धोरणाविरोधात शासनदरबारी आवाज उठवून कालव्यांची लांबी वाढविण्यासाठी मागणी करणार आहे. कालव्यासाठी शासनाकडे साठ कोटींची मागणी केली आहे.

- दौलत दरोडा, आमदार, शहापूर

-----

साजिवली ते खैरेदरम्यान फक्त खोदून ठेवलेला डावा कालवा पूर्णतः दुर्लक्षित आहे. देखभाल दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झालेल्या या कालव्यात साजिवली-सारंगपुरीदरम्यान शेवाळ-दुर्गंधीयुक्त पाणी आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही की पशुपक्ष्यांना पिण्यासाठी तसेच सारंगपुरी-खैरेदरम्यानच्या कालव्यात पाणीच नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- विठ्ठल धारवणे, शेतकरी, खैरे

Web Title: Irrigation purpose of Bhatsa project in Kera basket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.