महाराष्ट्रात महिलांना असंच ढकललं गेलेलं चालणार आहे का?, आव्हाडांवर विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:56 PM2022-11-14T13:56:09+5:302022-11-14T13:57:52+5:30
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यानं दाखल केली आहे.
ठाणे-
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यानं दाखल केली आहे. आव्हाड यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आज सकाळपासूनच याप्रकरणात मुंब्रा परिसरात तणावाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं सुरू आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यानं आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप; घटनेचा व्हिडीओ समोर आला, नेमके काय?
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित महिलेला तिथून बाजूला केलं. इतक्या गर्दीत कशाला आलीस असं विचारुन बाजूला केलं होतं, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसंच आव्हाडांनी केलेली कृती विनयभंग कशी ठरू शकते? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी पीडित महिला पदाधिकाऱ्यानं पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी आपल्याला धक्का दिला नाही, तर दोन्ही हातांनी पकडून मला जिथं पुरुषांचा घोळका होता तिथं ढकललं, असा आरोप केला आहे.
“जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य, राजीनामा देणे...”: सुप्रिया सुळे
तक्रारदार महिलेनं नेमकं काय म्हटलं?
"तुम्ही व्हिडिओतही सारं पाहू शकता. आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित होतो आणि प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊनच आम्ही सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटता यावं यासाठी कारच्या जवळ एका रांगेतून पुढे जात होतो. त्यात तुम्ही आमच्या पुढे श्रीकांत शिंदे यांनाही पाहू शकता. माझी मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबतही त्यांच्या भेटीसाठी बोलणं झालं होतं. त्यासाठी आम्ही कारच्या कडेनं पुढे जात होतो. पण त्यावेळी समोरून स्थानिक आमदार आले. आता ते आमदार असल्यानं मी त्यांना पाहून स्माइल केलं. पण त्यांनी तू इथं काय करतेस असं म्हणत मला दोन्ही हातांनी पकडून ढकललं. जिथं पुरुषांची गर्दी होती त्या ठिकाणी मला ढकललं गेलं. आता धक्का लागणं आणि धक्का देणं यात फरक आहे", असं आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
'विनयभंग?' जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून अंजली दमानियांचे ट्विट
सुप्रिया सुळेंना विचारा हिच परंपरा आहे का?
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत नेमका काय प्रकार घडला याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ आपण चार-पाच वेळा पाहिला. त्यात ते संबंधित महिलेला गर्दीत काय करतेयस असं विचारुन तिला बाजूला करताना दिसत आहे. तसंच माझं त्यांच्यासोबत सकाळीही बोलणं झालं आहे. महिला गर्दीत होती त्यामुळे धक्काबुक्की होऊ नये म्हणून मी बाजूला केलं असं त्यांनी सांगितलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावरही पीडित महिलेनं उत्तर दिलं आहे.
मी 'तो' व्हिडीओ संपूर्ण पाहिला, जितेंद्र आव्हाडांना विनंती करतो की...; अजितदादांनी दिली प्रतिक्रिया
"माझं सुप्रिया सुळे यांना एकच विचारायचं आहे की हिच महाराष्ट्राची परंपरा आहे का? महाराष्ट्रात महिलांना असंच ढकललं गेलेलं चालणार आहे का?", असं पीडित महिला म्हणाली. "त्यांनी मला हात लावल्यावर मला जे वाटलं ते मी पोलिसांना सांगितलं आहे. माझं स्टेटमेंट दिलं आहे. आता धक्का लागणं आणि धक्का देणं यात फरक कळत नाही का? धक्का मी दिलेला नाही त्यामुळे यात राजकारण आणण्याचा प्रश्नच नाही. जे कायद्यात आहे ते सगळ्यांसाठी समान आहे. त्यामुळे याही बाबतीत तो लागू होईल अशी आशा आहे", असंही त्या पुढे म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"