कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पात आहे का? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल, आयुक्तांना सुनावले खडे बोल..
By मुरलीधर भवार | Published: September 12, 2022 08:05 PM2022-09-12T20:05:02+5:302022-09-12T20:05:22+5:30
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बसला रस्त्यावरील खड्यांचा फटका.
कल्याण- कल्याणडोंबिवली शहरातील रस्ते इतके खराब आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे का असा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थित करीत महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना खडे बोल सुनावणीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांचा फटका केंद्रीय मंत्री ठाकूर यांनाही बसला आहे. तसेच शहर अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत जोरदार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे. हे खड्डे गणपती उत्सवापूर्वी बुजविले जातील असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गणपती उत्सव पार पडली तरी रस्त्यावरील अनेक ठिकाणचे खड्डे बुजविले गेले नाहीत. केंद्रीय मंत्री ठाकूर हे तीन दिवसाच्या कल्याण डोंबिवली दौ:यावर आहे. ते पक्षाच्या बैठका घेत आहे. तसेच व्यापारी वर्ग आणि प्रशासनाच्या अधिका:यांच्या भेटी गाठी घेत आहे.
आज सायंकाळी मंत्री ठाकूर यांनी महापालिका मुख्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी आयुक्त दांगडे यांच्यासह मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, किसन कथोरे, संजय केळकर आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पांसंदर्भात एक चित्रफित मंत्री ठाकूर यांना दाखविली जात होती. त्यांच्या शेजारीच आयुक्त बसले होते. यावेळी ठाकूर यांनी हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे. खड्डय़ामुळे रस्त्यांची स्थिती खूप खराब आहे. अन्य शहरातही स्मार्ट सिटी प्रकल्प राबविले जात आहे. त्या शहरात रस्ते चांगले झालेत. हॉटी कल्चर चा प्रयोग करुन शहर सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. तसेच शहरात स्वच्छता राखली जात आहे. याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यावर देशातील १०० शहरे स्मार्ट सिटी करण्यासाठी निवडली गेली. त्यापैकी कल्याण डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला गेला. एक हजार कोटीचे प्रकल्प या शहरात राबविले जात आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयी खुद्द केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केल्याने या प्रकल्पाच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.