असे झाले ‘इसिस’चे मुंब्रा ते औरंगाबाद कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:36 AM2019-01-25T00:36:05+5:302019-01-25T00:36:12+5:30
‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ या ग्रृपमधील सदस्य परदेशातील हॅन्डलरच्या संपर्कात असून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याची ‘पक्की खबर’ एटीएसला मिळाली होती.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : ‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ या ग्रृपमधील सदस्य परदेशातील हॅन्डलरच्या संपर्कात असून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याची ‘पक्की खबर’ एटीएसला मिळाली होती. त्यानंतर वेषांतर करुन एटीएसच्या पथकाने या सर्वांवर तीन ते चार महिन्यांपासून पाळत ठेवली. मुंब्रा ते औरंगाबाद असे या टोळीचे कनेक्शनही यातून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली
मुंबई आणि औरंगाबाद या दोन शहरांमध्ये घातपाती कारवाया होणार असल्याची खबर आॅगस्ट २०१८ मध्येच महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) ला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा येथून औरंगाबादमध्ये अलिकडेच आलेल्या मोहसीन खान याच्यावर या पथकाने पाळत ठेवली. त्यानंतरच २२ जानेवारी रोजी मुंब्रा आणि औरंगाबाद येथून नऊ संशयितांना ताब्यात घेतले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि औरंगाबाद शहरातील काही तरुण हे ‘इसिस’च्या संपर्कात असून ते आणखी काही तरुणांमध्ये जहाल विचार रुजवून त्यांना इसिसकडे येण्यासाठी प्रेरित करीत आहेत. तसेच काही जण या दोन शहरांमध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती औरंगाबाद ‘एटीएस’च्या पथकाला मिळाली होती. यामध्ये मुंब्रा येथील जमान, सलमान, फहाद, मजहर आणि शादाब यांचा तर औरंगाद येथील मोहम्मद तकी, मोहसिन, मोहम्मद मुशाहिद आणि मोहम्मद सफराज यांचा समावेश होता. ही नावे मिळाल्यानंतर मुंबईच्या ‘एटीएस’ पथकाने त्यांच्या राहण्याच्या ठावठिकाण्यांचा शोध घेतला. यात मोहसिन खान या संशयिताची पहिली माहिती या पथकाच्या हाती लागली. त्यातून त्याचा दिनक्रम, त्याच्या जाण्या येण्याची ठिकाणे, नातेवाईक तसेच त्यांची खाण्याची आणि आरामाची ठिकाणे इथपासून ते दिवसभरात कोणाशी किती वेळ काय संभाषण करतात, यावर एटीएसच्या पथकांनी साध्या वेषामध्ये पाळत ठेवली. हे साध्य होण्यासाठी पथकातील सर्वांनीच या संशयितांच्या पेहरावाशी मिळता जुळता पेहराव केला. यासाठी बहुतांश जणांनी दाढीही राखली. आॅगस्ट २०१८ पासून त्यांचे हे ‘वर्कआउट’ सुरु होते. २४ डिसेंबर २०१८ रोजी मुंब्रा येथील मोहसिन खान हा त्याच्या काही साथीदारांसह औरंगाबाद येथे वास्तव्याला आला.
>एटीएसने केली होती संशयित आरोपींची कोंडी
मोहसिन आणि त्याच्या साथीदारांनी ‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ हा ग्रुप तयार केला असून यातील सदस्य हे परदेशातील ‘इसिस’च्या संपर्कात आहेत. ही माहिती मिळाल्यानंतरच या सर्व संशयितांवर एटीएसने करडी नजर ठेवली होती. मोहसिन आणि त्याच्या साथीदारांच्या मोबाइलवर नजर ठेवण्यासह सर्वच बाजूंनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली. यातूनच औरंगाबाद आणि मुंबई हे या संशयितांच्या निशाण्यावर असल्याचीही माहिती मिळाल्यानंतर गोपनीयरीत्या एटीएसने ही कारवाई केली.