शिवसेनेच्या सरकार पुरस्कृत कार्यक्रमातून कोरोना पसरत नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:42+5:302021-08-19T04:43:42+5:30
कल्याण : भाजपची जनआशीर्वाद यात्रा ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरणार, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली ...
कल्याण : भाजपची जनआशीर्वाद यात्रा ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरणार, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, कोरोनाचे नियम पाळून जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. मात्र, शिवसेनेचे नेते आणि युवा नेते कुठेही जातात, तेव्हा कोरोना पसरत नाही का? शिवसेनेच्या सरकार पुरस्कृत कार्यक्रमातून कोरोना पसरत नाही का? भाजपने काही केले तर कोरोना पसरतो का, असा पलटवार केला आहे.
पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला बुधवारी दुर्गाडी चौकातून सुरुवात झाली. ही यात्रा सहजानंद चौक, शिवाजी चौक, कल्याण-मुरबाडमार्गे टिटवाळा ते बदलापूर येथून मार्गस्थ झाली. यावेळी त्यांना बल्याणी चौकात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत यांच्यावर पलटवार केला.
पाटील यांचे आगरी, कोळी समाज बांधवांनी जोरदार स्वागत केले. शिवसेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या मयूर पाटील फाउंडेशनने पाटील यांच्या स्वागताचे बॅनर बल्याणी, टिटवाळा येथे लावले होते. केंद्र सरकारने ‘तीन तलाक’संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल बल्याणीतील मुस्लीम महिलांनी पाटील यांचे विशेष आभार मानले. प्रेम ऑटोनजीक वारकरी संप्रदायाच्या सोबतीने टाळ-मृदुंगांच्या तालावर पाटील यांनी फेर धरला.
पाऊस असूनही यात्रेचा उत्साह कमी झालेला नव्हता. यात्रेत पाटील यांच्यासोबत भाजप आमदार किसन कथोरे, नेते जगन्नाथ पाटील, माजी आमदार कुमार आयलानी, नरेंद्र पवार, गुलाब करंजुले आदी मान्यवर सहभागी झाले होते.
‘कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गी लावणार’
कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या कामाविषयी पाटील म्हणाले, या प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आहे. हा प्रकल्पास मार्गी लावण्याची प्रक्रिया अधिक गतीने करणार आहे.
-----------------------------