महापालिकेच्या आणखी ४ विभागांना आयएसओ मानांकन
By धीरज परब | Published: January 30, 2023 01:10 PM2023-01-30T13:10:05+5:302023-01-30T13:10:33+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या आणखी ४ विभागांना आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.
मीरारोड -
मीरा भाईंदर महापालिकेच्या आणखी ४ विभागांना आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.
जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी सांगितले कि , आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरीकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक विभागाचे विकेंद्रीकरण करुन त्यातील कारभारात सुसूत्रता आणण्यास सुरूवात केली. त्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले. महापालिकेच्या विभागांना आयएसओ दर्जा देण्याकरीता पालिकेने मेसर्स दि एन. क्वालिटी सर्व्हिसेस या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या कंपनीद्वारे सुकाणू समितीची स्थापना करून मुख्य समितीत ४ उपसमित्या स्थापन केल्या. या उपसमित्या संबंधित विभागांचे डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड व हाऊसकिपींग, ट्रेनिंग, फिडबॅक देतील असे ठरविण्यात आले.
विभागातील प्रत्येक विषयाच्या विस्तृत व मुद्देसूद लिखाणासह प्रत्येक पदांच्या जबाबदाऱ्या व अधिकार निश्चित करण्यात आले. विभागांतील संकलनानुसार अभिलेख यादी तयार करुन कक्ष अद्यावत करण्यात आला. कक्ष व कार्यालयातील पदनिहाय प्रशिक्षणाच्या विषयांची यादी तयार करुन त्याचे वार्षिक नियोजन करण्यासह वैयक्तिक प्रशिक्षणाच्या नोंदी प्रत्येक विभागात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता पर्यंत सिस्टम अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमार्फत अग्निशमन विभाग, आस्थापना, सामान्य प्रशासन, लेखा व अभिलेख विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. तर आता सार्वजनिक बांधकाम, मिळकत, विद्युत व सचिव विभागास आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे . आयुक्त ढोले यांच्या हस्ते सदर विभागांच्या प्रमुखांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.