इस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:57 PM2018-08-20T22:57:48+5:302018-08-20T22:58:22+5:30
इस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत.
- वसंत भोईर
वाडा : इस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नगरसेवक मनिष देहेरकर, गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव व रोहन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. हे ४० इस्त्रायली विद्यार्थी जगभरात अनेक देशांचे दौरे करीत असून विविध देशातील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करीत आहेत. या वेळी त्यांनी भारताचा दौरा करण्याची इस्त्रायल सरकार कडे परवानगी मागितली होती. इस्त्रायलने भारत सरकार सोबत चर्चा करून या विद्यार्थ्यांना भारताचा दौरा करण्याची अनुमती देण्याची विनंती केल्यामुळे व ती भारताने दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी भागाचा दौरा करण्याचे निश्चित केले. या साठी विशेष करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच थ्री सिक्स्टी फाऊंडेशन चे चेअरमान रोहन ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याची निवड कारण्यासंदर्भात इस्त्राईली दूतावासासोबत चर्चा केली. या टीमच्या काही सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांचा सर्व्हे केल्यानंतर वाडा शहरातील शाळा नंबर २ ची निवड करण्यात आली आणि शनिवारी या विद्यार्थ्याची संपूर्ण टीम सोमवारी येथे दाखल झाली.
भारतीय शिक्षण पद्धती तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा हे युवक अभ्यास करणार असून या पाच दिवसांत शहरातील जिल्हापरिषद शाळा क्रमांक्र २ च्या शाळेचा कायापालट करणार आहेत. यामध्ये खेळणी, विज्ञान उपकरणे देणार इस्त्राईल, रंगरंगोटी करणार चमू
विद्यार्थ्यांचा क्लास घेणे, शाळेची रंगरंगोटी करणे, मुलांना खेळण्यासाठी गार्डन तयार करणे, खेळाचे साहित्य,सायन्स ची विविध उपकरणे, इस्त्रायल सरकार कडून शाळेतील मुलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही शाळा आदर्श ठरेल अशा पद्धतीने तिचा कायापालट केला जाणार आहे.
या स्वागत समारंभ दरम्यान इस्त्राईल विद्यार्थी टीमचे प्रमुख लिओन तौली यांनी या दौऱ्याचा उद्देश सांगितला तर नगरसेवक मनिष देहेरकर यांनी वाडा जिल्हा परिषद शाळेची या स्तुत्य उपक्र मासाठी निवड केल्याने नगर पंचायत व वाडा शहराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.