युतीच्या उमेदवारीचा मुद्दाच सर्वाधिक महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:19 AM2019-08-28T00:19:33+5:302019-08-28T00:19:38+5:30

उल्हासनगरात मूलभूत सुविधांची वानवा : कलानी कुटुंबास शिवसेनेचीही मिळू शकते उमेदवारी

The issue of the candidate's alliance is the most important | युतीच्या उमेदवारीचा मुद्दाच सर्वाधिक महत्त्वाचा

युतीच्या उमेदवारीचा मुद्दाच सर्वाधिक महत्त्वाचा

Next

सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं-१, २, व ३ विभागासह म्हारळ, कांबा, वरप आदी गावांचा समावेश असलेल्या उल्हासनगर मतदारसंघावर आधी जनसंघ-भाजपचे वर्चस्व होते. त्यानंतर दोन दशके कलानीराज होते. सलग चारवेळा निवडून आलेल्या पप्पू कलानीचा २००९ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे कुमार आयलानी यांनी तब्बल १२ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. मोदी लाटेत पप्पू कलानीच्या पत्नी ज्योती कलानी आमदार म्हणून निवडून आल्या. सद्य:स्थितीत कलानी कुटुंब भाजपच्या वाटेवर असल्याने शहरात विरोधीपक्ष नावालाच उरणार आहे. अशा स्थितीत विधानसभेची युतीची उमेदवारी कुणाला मिळणार कलानी की आयलानी यांना, हाच तुर्तास या मतदारसंघातील कळीचा आहे.
उल्हासनगर शहर कल्याण पूर्व, अंबरनाथ व उल्हासनगर अशा तीन मतदारसंघांत विभागले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची आशा होती. भाजप, शिवसेना, साई पक्ष व ओमी टीम एकत्र असतानाही शिंदे यांना फक्त ७३ हजार ३४५, तर राष्ट्रवादी पक्षाचे बाबाजी पाटील यांना १५ हजार ५६४ आणि वंचित आघाडीचे संजय हेडाव यांना १२ हजार ४१५ मतदान झाले. युती झाल्यास माजी आमदार व शहराध्यक्ष कुमार आयलानी इच्छुक आहेत.
युतीचे कट्टर विरोधक असणाऱ्या कलानी कुटुंबाने महापालिका निवडणुकीपासून भाजपशी घरोबा केला. कलानी कुटुंबाच्या सून पंचम कलानी भाजपच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आल्या असून त्या महापौर आहेत. ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या आमदार असून त्या भाजपच्या वाटेवर आहेत. मुलगा ओमी कलानी यांनी महापालिका निवडणुकीत ओमी टीमची स्थापना करून भाजपसोबत आघाडी केली आणि पालिकेत भाजपची सत्ता आणून दिली. उल्हासनगर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, पीआरपी, भारिप, रिपाइं गवई गट आदींचा एकही नगरसेवक नाही. रिपाइं आठवले गटाचे मात्र ३ नगरसेवक असून त्यांची भाजपसोबत युती आहे. रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. आमदार कलानी हे भाजपच्या वाटेवर असल्याने, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. काँग्रेसकडून शहराध्यक्ष राधाचरण करोतीया, डॉ. जयराम लुल्ला, जया साधवानी तर वंचित आघाडीकडून भारिपचे सुधीर बागूल व शिवसेनेकडून राजेंद्र चौधरी हे इच्छुक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत युती नसल्याने भाजपच्या तिकीटावर कुमार आयलानी, शिवसेनेचे धनंजय बोडारे, तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर ज्योती कलानी उभ्या होत्या. कलानी यांना ४३ हजार ७६०, आयलानी यांना ४१ हजार ८९७, तर बोडारे यांना २३ हजार ८६८ मते मिळाली होती. युती झाली नाही, तर भाजप कलानी कुटुंबाला रितसर प्रवेश देवून त्यापैकी एकाला उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी दिली नाही, तर त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेनेवर नागरिक नाराज
महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची १० वर्ष सत्ता होती. त्यानंतर भाजपने ओमी टीमसोबत आघाडी करून पालिकेत सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना अप्रत्यक्ष सत्तेत सहभागी झाली. मात्र शहराचा विकास होण्याऐवजी शहर बकाल झाल्याची टीका होत आहे. धोकादायक इमारती, पाणीटंचाई, आरोग्य, साफसफाई, डम्पिंग ग्राऊंड, शहर विकास आराखडा, भुयारी गटार, खेमानी नाला, रस्त्याची दुरवस्था, बेकायदा बांधकामे आदी अनेक समस्या तशाच आहेत. मूलभूत सुविधा मिळत नसल्याने सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाराज आहेत.

वंचित आघाडी, रिपाइं पर्याय : शहरात दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय समाजाची संख्या लक्षणीय आहे. रिपाइं गटतट एकत्र येवून त्यांनी वंचित आघाडीला सोबत घेतल्यास शिवसेना-भाजपला पर्याय ठरू शकतात. काँग्रेसची ताकद मर्यादित असून राष्ट्रवादीची ताकद कलानी कुटुंबामुळे शहरात होती.

शिवसेनेने लावली फिल्डिंग : ऐनवेळी युती तुटल्यास शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी निवडणूक रिंगणात असतील असे बोलले जात आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून गेल्यावेळी धनजंय बोडारे यांना २३ हजार मते मिळाली होती.

Web Title: The issue of the candidate's alliance is the most important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.