दलित वस्तीच्या कामातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:42 AM2021-07-30T04:42:10+5:302021-07-30T04:42:10+5:30
ठाणे : म्हारळ येथील दलित वस्तीतील रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारावर तीन वर्षांपासून सदस्या वृषाली शेवाळे आवाज उठवत आहेत. ...
ठाणे : म्हारळ येथील दलित वस्तीतील रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारावर तीन वर्षांपासून सदस्या वृषाली शेवाळे आवाज उठवत आहेत. गुरुवारी सर्वसाधारण सभेतदेखील त्यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला. दीर्घ चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यासह ग्रामसेविकेची विभागीय चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
या आधीच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी १५ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही त्यांना कारवाई सुरू असल्याचेच उत्तर प्रशासनाने देऊन चालढकल केली. कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष, तसेच इंदिरानगर दलित वस्ती रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी लावून धरली आहे. मागील सर्वसाधारण सभेत त्यांनी पुन्हा या मुद्द्याला हात घालत कारवाईची माहिती मागितली. त्यांनी सभागृहात प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
यापूर्वी या प्रकरणात कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली होती; मात्र, या भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या ग्रामसेवकांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याचे सदस्य शेवाळे यांनी सभागृहास सांगितले. याप्रकरणी विभागीय चौकशीचे काय झाले, दोषींवर कारवाई कधी करणार, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. किमान सदस्य पदाच्या पाच वर्षांत तरी कारवाई होईल का, असा संतप्त सवालदेखील त्यांनी केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) चंद्रकांत पवार यांनी ग्राम विकास अधिकारी आणि महिला ग्रामसेविका यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कारवाई सुरू केल्याचे सांगितले.