ठाण्यातील लढतीत शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:04 AM2019-04-05T05:04:55+5:302019-04-05T05:09:10+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.
अजित मांडके
ठाणेलोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर या मतदारसंघावर कब्जा केला होता. परंतु, त्यांना फार काळ सत्ता टिकवता आली नाही. २०१४ मध्ये आलेल्या मोदीलाटेत शिवसेनेने राजन विचारे यांना संधी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा दोन लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. परंतु, आता नाईक पितापुत्राने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने कल्याणचे माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे शिवसेनेच्या राजन विचारे यांच्याविरुद्ध लढत देणार आहेत. गेल्या काही दिवसांत उडत असलेल्या प्रचाराच्या धुराळ्यामुळे आणि गाजत असलेल्या शिक्षणाच्या मुद्यामुळे तसेच माजी आणि आजी पालकमंत्र्यांमध्ये उडत असलेल्या खटक्यांमुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.
राष्ट्रवादीला केवळ ऐरोली मतदारसंघच काबीज करता आला आहे. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे ५३ नगरसेवक आहेत, तसेच अपक्ष पाच नगरसेवक हेही राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याने ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या १६ वरून ३७ वर गेली आहे.
तर, भाजप नगरसेवकांची संख्या ही एकवरून सहावर गेली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून भाजपचे २३ नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ नगरसेवक आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या शून्य आहे.
काँग्रेसचे येथे १२ नगरसेवक असून मुझफ्फर हुसेन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गिल्बर्ट मेंडोन्सा हे शिवसेनेशी जवळीक साधून असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. शिवसेना नगरसेवकांची संख्या २२ वर पोहोचली आहे, तर भाजप नगरसेवकांची संख्या थेट ६१ वर गेली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत राजन विचारे यांचा विजय झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला येथे पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर, आता पुन्हा शिवसेनेकडून राजन विचारे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याशी लढत देण्यासाठी गणेश नाईक किंवा संजीव नाईक रिंगणात उतरतील, अशी आशा होती. पक्षश्रेष्ठींनी शेवटच्या क्षणापर्यंत नाईक यांना निर्णयाची संधी दिली होती. परंतु, त्यांनी आपल्याला दिल्लीत जाण्यात रस नसल्याचे सांगत निवडणुकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे राष्टÑवादीकडून आता आनंद परांजपे हे रिंगणात उतरले आहेत. बहुजन वंचित आघाडीकडून मल्लिकार्जुन पुजारी आणि महाराष्टÑ क्रांती सेनेच्या वतीने रवींद्र साळुंखे रिंगणात उतरले आहेत. परंतु, खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी काँग्रेस अशीच होणार आहे. दरम्यान, मागील लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचा वरचष्मा दिसून आला आहे. ठाणे, मीरा-भार्इंदर आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असून ठाणे, कोपरी- पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघांत शिवसेनेचे तीन आमदार आहेत.
काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन हे राष्टÑवादीसाठी काम करण्यासाठी मैदानात उतरले असल्याने राष्टÑवादीला त्यांचा कितपत फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसेने या निवडणुकीत माघार घेतली असली, तरी मोदींविरोधात राज ठाकरे हे सभा घेणार असल्याने त्याचा कितपत फायदा ठाण्यात राष्टÑवादीला होणार, हेही औत्सुक्याचे आहे.
दोन्ही पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने शिवसेनेविरोधात आणि काँग्रेसने राष्टÑवादीविरोधात काम करण्यास नकार दिला होता. परंतु, आता या वादावर पडदा पडला आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट माजी पालकमंत्री तथा राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांच्यावर टीका केल्याने नाईक यांनीही शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.
त्यामुळे आता प्रचारात खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्याच्या धुराळ्यातच ही निवडणूक रंगतदार होणार, असे संकेत प्राप्त झाले आहेत. निवडणुकीत येत्या काही दिवसांत दोन्ही उमेदवार अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.