अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार! अंबादास दानवेंचा इशारा
By जितेंद्र कालेकर | Published: December 17, 2023 11:11 PM2023-12-17T23:11:41+5:302023-12-17T23:11:54+5:30
न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ठणकावून सांगितले
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे येथे एमएसआरडीसी व्यवस्थापकाच्या मुलाने तरुणीला मारहाण करून तिला जाणीवपूर्वक गाडीची धडक दिली. त्यामुळे त्याच्या विरोधात तातडीने कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी दिला.
यातील अपघातग्रस्त पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली. यातील पिडित तरुणीची दानवे यांनी रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली. तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही उपस्थित होते. या घटनेतील अश्वजीत गायकवाड याने जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली आणि तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले.
व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम पोलिसांनीही लावले नसल्याचा आरोप पिडितेने दानवे यांच्याकडे केला. त्याच अनुषंगाने अश्वजीत हा कोणाचा मुलगा आहे, कोण आहे आहे? यापेक्षा पोलिसांनी कायद्याचे पालन करावे, अशा सूचना दानवे यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना दिल्या. पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप दानवे यांनी केला. तसेच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती.
कायदा हा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असल्याचेही दानवे म्हणाले.