भिवंडीमधील वीजग्राहकांप्रश्नी राज्यपालांना घातले साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:29 AM2021-03-11T00:29:42+5:302021-03-11T00:29:52+5:30
वाढीव बिलाने ग्राहक त्रस्त : सरकारने योग्य निर्णय घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील वीजग्राहक वाढीव वीजबिलाने मेटाकुटीस आले असून सरकारने सुरुवातीला जाहीर केलेली १०० युनिटमाफीची घोषणा फसवी ठरली आहे. या समस्येवर सरकारने योग्य निर्णय घेऊन वीजग्राहकांना दिलासा द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी व आमदार महेश चौघुले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.
राजभवन येथे गेलेल्या शिष्टमंडळात भाजप गटनेते हनुमान चौधरी, सभागृह नेते श्याम अग्रवाल, नगरसेवक यशवंत टावरे, भाजप शहर सरचिटणीस प्रेमनारायण राय, विशाल पाठारे, कोषाध्यक्ष हसमुख पटेल, दक्षिण भारतीय आघाडी कोकण विभाग संयोजक मल्लेशम कोंका आदी उपस्थित होते. शेट्टी व चौघुले यांनी भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांबाबत तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देत ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात वाढीव वीजबिल देण्यात आले. याबाबत कोणताही दिलासा राज्य सरकारने दिला नसून १०० युनिटपर्यंत वीजबिलमाफीची घोषणा करून ती पूर्ण न करण्याने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
लॉकडाऊनकाळात शहरातील असंख्य परप्रांतीय कामगार कुटुंबासह गावाला गेले असतानाही वाढीव वीजबिल देऊन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर, टोरंट पॉवर कंपनीकडून थकीत बिलाच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित केला जात आहे. शहरातील यंत्रमागधारकांसह ग्राहकांवर वीजबिलवसुलीसाठी जबरदस्ती न करता बिल भरण्यासाठी मुदत द्यावी, जेणेकरून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल. राज्यपालांनी सरकारला निर्देश देऊन भिवंडीतील ग्राहकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. राज्यपालांनी यावर सकारात्मक चर्चा करून लवकरच बैठक घेण्याबाबत निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.