ठाण्यात पावसाचे बरसणे सुरूच; भिंत अन् झाडे पडून १४ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:31 AM2021-07-19T11:31:10+5:302021-07-19T11:31:22+5:30

ठामपाच्या रुग्णवाहिकेसह तीन वाहनांचा समावेश 

It continues to rain in Thane; Massive damage to 14 vehicles due to falling wall and trees | ठाण्यात पावसाचे बरसणे सुरूच; भिंत अन् झाडे पडून १४ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ठाण्यात पावसाचे बरसणे सुरूच; भिंत अन् झाडे पडून १४ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next

ठाणे: सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी पहाटे पासून कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मागील चोविस तासात ठाणे शहरात १६१.८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सोमवारी सकाळी ८.३० ते १०.३० या एक तासात ५८.४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळाच्या पटरीत पाणी साचलेले होते. त्यातच तक्रारींनीही ठाण्यात अर्धशतक पार केले आहे. जिल्ह्यात एकूण १०७५मिमी.पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २४ तासात  सरासरी १५२ मिमी पावसाची नोंद सात तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे.

झाडे,भिंती,आग आणि पाणी तुंबण्याच्या यामध्ये प्रामुख्याने घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास १४ गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच घोडबंदर रोडवरील एका सोसायटीत वाळलेल्या झाडाची फांदी खाली पडून सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. तर धरण क्षेत्रात ही समाधान कारक पाऊस झाला आहे. याशिवाय पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे. नदीतील पुराचे पाण्यासोबत पानवेली व नदीतील गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्टेशनमधे अडकल्याने पंपाचा फ्लो कमी झाला आहे. 

शनिवारी रात्री पासून पावसाने चांगला जोर धरला आहे. उघडझाप करत दोन दिवसात पावसाने दमदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. सोमवारी ही पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८.३० ते ९.३० वाजण्याच्या सुमारास ४२.४२ मिमी तर त्या नंतरच्या एक तासात १६ मिमी पाऊस झाला. त्यानंतर ही पावसाचे बरसणे सुरू होते. तर गेल्या चोवीस तासात १६१.८२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. 

पाणी तुंबण्याच्या एकूण २३ तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा, कोपरी,वागले इस्टेट, मुंब्रा, नौपाडा येथील वेगवेगळ्या भागात पाणी तुंबले होते. तर शहरात पाच ठिकाणी सरंक्षण भिंती कोसळल्या आहेत. त्यामध्ये घोडबंदर रोड येथील कॉसमॉस लाऊंज येथील भिंत पडल्याने ५ चारचाकी तर ४ दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर मुंब्र्यातील अमृतनगर येथे  १० ते १५ फुटांची भिंत पडली आहे.

तसेच खारीगाव, ठाणे चेंदणी कोळीवाडा, घोडबंदर रोड डोंगरीपाडा येथे भिंत पडली आहे. याशिवाय शहरात ९ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. यामध्ये दादोजी कोंडदेव येथे पडलेल्या झाडामुळे तीन गाड्यांचे नुकसान झाले असून त्या गाड्या महापालिकेच्या आहेत. त्यामध्ये एक रुग्णवाहिकेचा समावेश आहे. तर वाघबील विजयनगरी येथे पडलेल्या झाडामुळे दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच नौपाडा, कळवा,मुंब्रा, उपवन आदी ठिकाणी झाले पडली आहेत. तसेच दोन ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक झाली आहे. 

फांदी पडून एक जण जखमी

शहरात वागळे इस्टेट ,ढोकाळी आणि वाघबील येथे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहे. यामध्ये वाघबील नाका येथील लोटस सोसायटी परिसरात घडलेल्या घटनेत, त्या सोसायटीचा सुरक्षारक्षक संतलाल यादव (४०) यांच्या डोक्यात वाळलेल्या झाडाची फांदी पडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला १३ टाके पडले असून त्यांना पातलीपाडा येथील रुग्णालयात दाखल केले होते.

पिसे येथील पंपात गवत अडकले

पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे. नदीतील पुराचे पाण्यासोबत पानवेली व नदीतील गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्टेशनरमधे अडकल्याने पंपाचा फ्लो कमी झाला आहे. त्यामुळे पिसे येथून पाणी पुरवठा कमी प्रमाणात हो असल्यामुळे शहरांतील सर्व भागांत सोमवारपासुन पुढील दोन दवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती ठामपाच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

Web Title: It continues to rain in Thane; Massive damage to 14 vehicles due to falling wall and trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.