सरकारच्या विविध कायद्यामुळे पाककला व्यवसाय करणं अवघड - विष्णू मनोहर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 04:54 PM2017-11-13T16:54:01+5:302017-11-13T16:55:02+5:30
एखादा पाककला व्यवसाय सुरू करताना सरकारने खूप कायदे लावले आहेत. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच डोंबिवलीत तरी व्यवसाय सुरू करणार नसल्याचे मत प्रसिद्ध पाककलातज्ज्ञ विष्णू मनोहर यांनी बोलताना व्यक्त केले.
डोंबिवली - एखादा पाककला व्यवसाय सुरू करताना सरकारने खूप कायदे लावले आहेत. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच डोंबिवलीत तरी व्यवसाय सुरू करणार नसल्याचे मत प्रसिद्ध पाककलातज्ज्ञ विष्णू मनोहर यांनी बोलताना व्यक्त केले. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमांतर्गत पाककलातज्ज्ञ विष्णू मनोहर यांच्या मनमुराद गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विष्णू यांनी बनवलेल्या पदार्थाची चव चाखता यावी म्हणून खवय्यांनी त्यांना आपला व्यवसाय येथे शहरात सुरू करण्याविषयी विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. सुयोग मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विष्णू मनोहर म्हणाले, पाककला हे खूप व्यापक शास्त्र आहे. एखाद्या पदार्थात लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची वापरली किंवा एखादा घटक न वापरता ही पदार्थ बनविता येतो. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचे पेटंट घेण्याच्या मी भानगडीत पडत नाही. वर्ल्ड रेकॉर्ड करताना प्रथम घरातून विरोध होता. पण कामानिमित्त अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेतून परतल्यावर वर्ल्ड रेकॉर्ड करायचा अशी कंबरच कसली. पण जेव्हा माझ्या आधीच्या व्यक्तीने 40 तासांचा रेकॉर्ड केल्याचे समजले तेव्हा मी थोडा घाबरलो. पण तपश्चर्या व सराव करून वर्ल्ड रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड माझ्या पाककलेच्या प्रेमापोटीच करू शकलो. सर्वात प्रथम मी ढोकळा बनविला होता. परंतु त्यांचा ढोकळा काही झाला नाही. त्यानंतर सहावीत असताना आवळा सुपारी बनविली. आवळा सुपारी बॉक्स मधून शाळेत विकत असे. लहानपणापासून व्यवसाय करण्याची आवड होती. आवळा सुपारीमुळे ती रूची वाढत गेली. कॅटरिंग या व्यवसायाचे मी कोणतेच प्रशिक्षण घेतले नाही. शाळेत पास व्हायचो. शाळेत जितका अभ्यास केला नाही तेवढा अभ्यास आता करावा लागत आहे. आतापर्यंत 50च्या वर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागत आहे. ‘याराना’ हा चित्रपट पाहून लोकांनी आपल्याला आमंत्रित केले पाहिजे असे काहीतरी करावे ही इच्छा जागृत झाली. एखाद्याला हे वाटणो महत्त्वाचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.
पाककला ही देखील एक कला
पाककला ही देखील 64 कलांपैकी एक कला आहे. पदार्थ करताना तुम्ही टेक्नीक वापरता असता म्हणून तुम्ही टेक्नीशयन आहात. पदार्थ बनविताना रंग, पोत पाहिला जातो. म्हणून त्यात विज्ञान येते. पदार्थ आकर्षक दिसावा म्हणून प्रेझेंटेशन महत्त्वाचे असते. म्हणून तुम्ही चांगले आर्टिस्ट असता. तुमचा प्रत्येक पदार्थ इनोवोटिव्ह असावा. आम्ही सांगतो तसाच पदार्थ करण्याची गरज नाही. तुमचा वेगळापणा जपा. त्यातूनच नवीन पदार्थाची निर्मिती होत असते. पारंपरिक पदार्थ म्हणून आपण ज्या पदार्थांना ओळखतो ते कुणीतरी आधी केले होते. तसेच तुम्ही पदार्थात वेगळेपणा जपला तर तुमचा पदार्थ ही भावी पिढीसाठी पारंपारिक पदार्थ बनेल. पदार्थ बनविताना प्रेझेंटेशन आणि पोषणमूल्य दोन्हीचा समतोल राखला पाहिजे. डायट करताना आपल्याला त्यांचा कंटाळा येईल असे करू नये, असा सल्ला ही त्यांनी दिला.
पाककलेतील सम्राटाने केली नटसम्राटांची हुबेहुब नक्कल
नटसम्राट चित्रपटातील ‘टु बी और नॉट टु बी’ हा संवाद नाना पाटेकर यांच्या आवाजासारखा हुबेहुबे आवाज काढून मनोहर यांनी सादर केला. पाटेकर यांचा हुबेहुबे आवाज काढल्याने प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. याच संवादाच्या लाईनवर ‘डायटिंग’विषयी संवाद मनोहर यांनी तयार केला आहे. तो ही त्यांनी यावेळी सादर केला. या संवादाला प्रेक्षकांकडून वन्स मोअरची दाद मिळाली.