शिक्षक ते शिक्षणाधिकारी... शिक्षकांमुळेच घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:29 AM2019-09-05T01:29:58+5:302019-09-05T01:30:26+5:30
नोकरी आणि संसार सांभाळत संगीता भागवतांनी मिळवले स्पर्धा परीक्षांमध्ये यश
ठाणे : माझा जन्म सर्वसामान्य कुटुंबातला. वडील शिक्षक होते. पण, तेव्हा आम्हाला स्वत:चे करिअर निवडण्याची मुभा नव्हती. दहावीनंतर लग्न झालं. लग्नानंतर वडीलधाऱ्यांनी डीएडच्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन दिला आणि पुढे वडिलांचा वारसा जपत शिक्षक होण्याचे ठरवले. शिक्षक तर झाले, पण यातून पुढे आणखी कोणकोणत्या पदांवर काम करता येते, याची कल्पना नव्हती. त्यावेळी जीवन पवार आणि खोतसर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला. नोकरी आणि संसार सांभाळून परीक्षा देत राहिले आणि आज शिक्षणाधिकारीपदी पोहोचले, याचे श्रेय शिक्षकांनाच, अशा शब्दांत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी ऋण व्यक्त केले.
दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल, पाटण, सातारा येथे झाले. वडील जवळच्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरात अभ्यासाचे आणि शिस्तीचे वातावरण होते. दहावीनंतर मला पुढे शिकण्याची इच्छा होती. कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, हे ठरवलेलं नव्हतं. मात्र, शिकायचं होतं. पण लग्नानंतर डीएडला प्रवेश झाला. त्या काळात मुलींनी सहसा डीएड, बीएड करावे, असाच आग्रह असायचा. कमला नेहरू अध्यापक विद्यालय, कराड, सातारा येथे डीएड पूर्ण केले. तेथील शिक्षकांनी आम्हाला चांगले शिक्षक होण्यासाठी शिकवण देतानाच एक चांगली व्यक्ती म्हणूनही घडवले. त्यांची शिकवण ही आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगी आहे.
स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे...
डीएड झाल्यावर मला १९९१ साली शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. माझ्यातील अभ्यासूवृत्ती आणि मेहनत करण्याची तयारी पाहून मला जीवन पवार आणि खोतसरांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे सुचवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी २००१ ते २०१३ सलग १३ वर्षे विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा देत राहिले आणि यश मिळवले. पण, हेच मार्गदर्शन जर मला वेळीच मिळाले असते, तर वर्षे वाया गेली नसती.
त्या १३ वर्षांत मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था क्लास-२, गटशिक्षणाधिकारी क्लास-२, तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि जिल्हा शिक्षणाधिकारी अशा चार पदांसाठी परीक्षा दिल्या आणि त्यात उत्तीर्ण झाले. पण, घरातील वडिलांचा शिक्षकीचा वारसा सांभाळण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणातच रमण्याचे ठरवले आणि शिक्षणाधिकारीपदी रुजू झाले. माझ्या वडिलांकडून आलेला हा शिक्षकपदाचा वारसा माझ्या पुढच्या पिढीनेही जोपासला आहे. माझा मुलगा स्वप्नील हासुद्धा शिक्षक आहे.
डीएड कोर्सदरम्यान वसतिगृहात कुटुंबीयांना भेटायलाही होती बंदी...
लग्नानंतर डीएडचा कोर्स केला. त्यासाठी हॉस्टेलला राहावे लागत असे. त्यावेळी अभ्यास आणि मुलींची सुरक्षितता लक्षात घेत १५ दिवसांतून एकदा घरी जाण्याची परवानगी दिली जायची. मात्र, त्यादरम्यान जर कुटुंबातील कोणी व्यक्ती भेटायला हॉस्टेलला आली, तर त्यांची भेटही घडवली जात नव्हती. अनेकदा माझ्या कुटुंबातील माणसे येऊन न भेटताच परत जायची. तेव्हा खूप वाईट वाटायचे, पण ती गजेंद्र आईनापुरेसरांची कडक शिस्त होती. कोणालाही त्यात सवलत मिळत नसे.
शिक्षकांनी चांगलं माणूस म्हणूनही घडवलं...