माहेरी गेलेल्या पत्नीसाठी ‘तो’ झाला मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 12:42 AM2019-05-04T00:42:49+5:302019-05-04T06:23:51+5:30

आरोपीला अटक : पोलीस ठाण्यात आरोपीच्या मोबाइलची रिंग वाजताच फुटले बिंग

'It' happened for the wife of mother-in-law | माहेरी गेलेल्या पत्नीसाठी ‘तो’ झाला मंत्री

माहेरी गेलेल्या पत्नीसाठी ‘तो’ झाला मंत्री

googlenewsNext

कल्याण : कोण कधी काय शक्कल लढवेल, याचा अंदाज बांधणे तसे कठीणच; पण कधीकधी ही शक्कलच अंगाशी येते. असाच काहीसा प्रकार कल्याण ग्रामीणमधील वाहोली गावात घडला. भांडण झाल्याने रागाने माहेरी गेलेली पत्नी खूप प्रयत्न करूनही घरी येत नसल्याने या गावातील नितीन जाधव याने चक्क टिटवाळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन करून ‘आपण राज्यमंत्री बोलत आहोत. त्या जाधवांचे प्रकरण काय आहे, ते बघा जरा’ असा दम दिला. मात्र, पोलिसांनी शहानिशा केली असता हा बनावट फोन असल्याचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी जाधव याला शुक्रवारी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी नितीनचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे पत्नी रागाने माहेरी गेली होती. ती काही केल्या घरी येत नसल्याने त्याने यावर मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना फोन करून ‘मी राज्यमंत्री बोलतोय. जाधवचे प्रकरण काय आहे, ते मार्गी लावा. तुम्ही काय केले? तुमच्यावर कारवाई करू. पनवेलला पोलीस का पाठवले नाहीत’ असा दम भरला. यानंतर, पांढरे यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश पोलिसांना दिले.

थेट राज्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची समज झाल्याने वाहोली येथील जाधव यांच्या घरी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांना पाहताच राज्यमंत्र्यांचा फोन आला होता की नाही, त्यात लक्ष घाला म्हणून, असे तो म्हणाला. मात्र, जाधव आणि त्याच्या पत्नीमधील वादाचे प्रकरण पनवेल पोलीस ठाण्यात सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी जाधवला टिटवाळा पोलीस ठाण्यात आणले. पांढरे यांनी राज्यमंत्र्यांच्या नावाने आलेल्या फोनवर डायल करताच जाधवच्या मोबाइलची रिंग वाजली आणि त्याचे बिंग फुटले. पोलिसी खाक्या दाखवताच जाधव याने संपूर्ण प्रकार सांगितला. 

यापूर्वीही केला होता खोडसाळपणा
पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाविषयी अधिक तपास केला असता जाधव याने यापूर्वीही असा खोडसाळपणा केल्याचे उघड झाले. या नंबरवरून जाधव याने कधी भाजप जिल्हाध्यक्ष, तर कल्याण तालुकाध्यक्षाच्या नावाने फोन केल्याचेही उघडकीस आल्याने हे प्रकरण चांगलेच अंगाशी आले आहे.

Web Title: 'It' happened for the wife of mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.