बेशुद्ध व्यक्तीला कोणत्याही परीस्थितीत काहीही खायला, प्यायला देऊ नये- डॉ. अपूर्वा देशपांडे
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 19, 2024 04:43 PM2024-05-19T16:43:33+5:302024-05-19T16:45:51+5:30
बेशुद्ध रुग्णाला त्या अवस्थेत पाणी पाजले तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती सीपीआर तज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी दिली.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बेशुद्ध रुग्ण हा कधीच बेशुद्धीमुळे तात्काळ मृत्यू पावत नाही. उलट, त्याला बेशुद्ध अवस्थेत पाठीवर झोपावल्यावर त्याची जीभ श्वास मार्गात अडकते आणि त्याचा श्वास अडकतो, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्याला कुशीवर झोपून ठेवल्यास त्याची जीभ श्वास मार्गात अडकणार नाही आणि त्या व्यक्तीचा श्वास सुरू राहील. कोणत्याही परिस्थीतीत बेशुद्ध अवस्थेत काहीही खायला, प्यायला देऊ नये. एखादा व्यक्ती बेशुद्ध पडल्यावर त्याला पाणी प्यायला दिले जाते किंवा त्यावर पाणी शिंपडले जाते. बेशुद्ध रुग्णाला त्या अवस्थेत पाणी पाजले तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो अशी माहिती सीपीआर तज्ञ डॉ. अपुर्वा देशपांडे यांनी दिली.
डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात रविवारी सहयोग मंदिर येथे सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ दयानंद कुंबळा यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर या विषयावर डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. एखादा व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला तर त्याचा श्वास चालू आहे की नाही हे आधी तपासावे आणि त्याला लगेचच डाव्या किंवा उजव्या कुशीवर ठेवावे. श्वास बंद असेल तर तात्काळ सीपीआर सुरू करावा हे सांगताना डॉ. देशपांडे यांनी सीपीआरची प्रात्यक्षिके कृतीद्वारे दाखविली.
बेशुद्ध रुग्णाला पाठीवर झोपवल्यास त्याची जीभ श्वास मार्गात अडकल्याने मेंदूला ऑक्सीजन पुरवठा पुर्ण बंद होतो. त्यामुळे पुढच्या तीन ते चार मिनिटांत त्याचा मृत्यू होतो. जीभ अडकल्यावर बेशुद्ध व्यक्तीची हृदय आणि फुप्फुुसाची क्रीया बंद पडते. सीपीआरमध्ये दोन ते अडीच मिनिटे दाब द्यावा जेणे करुन श्वास आणि हृदयक्रिया चालू होते. ३० वेळा छातीवर दाब आणि माऊथ टू माऊथ ब्रिदींग दोन वेळा द्यावी. छातीवर कुठे दाब द्यायचा, श्वास मार्ग कसा उघडायचा हे डॉ. देशपांडे यांनी पुढे सांगितले. सीपीआरचे प्रोटोकॉल मात्र कटाक्षाने पाळावे लागतात. सीएबी (कॅब) यात सी म्हणजे ३० वेळा छातीवर दाब देणे, ए म्हणजे श्वास मार्ग ओपन करायचे. त्याचे तंत्र म्हणजे डोके मागे आणि हनुवटी वर करायची आणि बी म्हणजे ब्रिदींग यात तोंडावाटे श्वास द्यायचा. जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत सीपीआर चालू ठेवायचे. यावेळी त्यांनी बेशुद्ध रुग्ण कसा ओळखायचा, त्याला कसे हाताळायचे हे सांगितले.