Kalyan: मनाच्या एकाग्रतेसाठी योग साधना करणे गरजेचे, KDMC आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन
By मुरलीधर भवार | Published: June 17, 2023 06:24 PM2023-06-17T18:24:56+5:302023-06-17T18:25:53+5:30
Kalyan News: मनाच्या एकाग्रतेसाठी योगसाधना गरजेची असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी नुकतेच केले.
- मुरलीधर भवार
कल्याण - मनाच्या एकाग्रतेसाठी योगसाधना गरजेची असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी नुकतेच केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाने १५ ते २१ जून कालावधीत आयोजित केलेल्या योग सप्ताहाच्या उद्घाटनावेळी आयुक्तांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या वेळी महापालिका उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, स्वाती देशपांडे, वंदना गुळवे, विनय कुलकर्णी, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दिशा सावंत, सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
क्रीडा व सांस्कृतिक विभागाने १५ जूनला महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महिला कर्मचा-यांसाठी, १६ जूनला पुरुष कर्मचा-यांसाठी योग शिबिराचे आयोजन केले होते. महिला कर्मचा-यांना वीणा निमकर यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले. पुरुष कर्मचा-यांना रविंद्र पाटील, राकेश मळेकर या योग शिक्षकांनी प्रशिक्षण दिले. या योग प्रशिक्षणात सूर्यनमस्कार, हलासन, मत्स्यासन, भुजंगासन, नौकासन, चक्रासन आसनांची माहिती थेट प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली.
हे योग प्रशिक्षण शिबीर, योग सप्ताहाच्या पुढील कालावधीत १९ आणि २० जून रोजी महापालिकेची विविध प्रभाग कार्यालये, शाळा येथे होणार आहे. योगदिनानिमित्त सफाई कर्मचारी यांना देखील विविध प्रभाग क्षेत्रात योगासनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २१ जून रोजी योगदिन हा वै.हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडागृहात महापालिका अधिकारी, कर्मचारी व महापालिका शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसमवेत मोठया प्रमाणात होणार आहे.