निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत
By अजित मांडके | Published: April 5, 2024 04:58 PM2024-04-05T16:58:58+5:302024-04-05T16:59:56+5:30
भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
ठाणे : लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण निवडणुकींच्या कामाला लागतो. शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो. मात्र भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. म्हात्रे यांची उमेदवारी झाल्यानंतर अवघ्या दोन तासात एमएमआरडीए कामाला लागते ही आर्श्चयाची बाब असल्याचेही ते म्हणाले. वास्तविक पाहता एमएमआरडीएला देखील माहिती आहे, या गोडावूनच्या बाबतीत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातून स्टे मिळविला आहे. परंतु तरी देखील अशा पध्दतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्य काळातील जमिनींचे फेरफार कोणी कसे बदलले हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर टीका केली.
तुम्ही फक्त घाबरून, दम देऊन निवडणुका लढवू शकता हे आता स्पष्ट झाले असून आता तुम्हाला पराभव दिसत असल्यानेच अशी कृत्ये केली जात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे अशी माणसे लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले. ठाणे लोकसभेच्या मुद्यावरुन त्यांना छेडले असता, प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मिळावी असे वाटत असेल तर त्यात गैर काय? प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असल्याचेही ते म्हणाले.