रस्ते सुरक्षा अभियानासारखे उपक्रम राबवणे ही खेदाची बाब - संतोष जुवेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:47 PM2021-02-08T18:47:07+5:302021-02-08T18:48:27+5:30
Thane Traffic Police : आपलं कर्तव्य म्हणून वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, असे आवाहन सिने अभिनेते संतोष जुवेकर यांनी केले.
ठाणे : वाहतुकीचे नियम सांगण्यासठी रस्ता सुरक्षा अभियानासारखे कार्यक्रम राबवावे लागतात, ही खेदाची गोष्ट आहे. गेल्या ३२ वर्षापासून हे अभियान सुरू असलं तरी हे बंद होणे गरजेचे आहे. नियम ऐकण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आपलं कर्तव्य म्हणून वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, असे आवाहन सिने अभिनेते संतोष जुवेकर यांनी केले.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत गरजू व्यक्तींना सोमवारी हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संतोष जुवेकर आणि मंगेश देसाई उपस्थित होते. भारतीय नागरिक नियमांचा आदर करतो. परंतू, ते नियम लगेच विसरतो. पोलीस अधिकारी दिसल्यावर नियम आठवतात. दुचाकीवर असले की लगेच हेल्मेट आणि कारमध्ये सीटबेल्ट लावले जातात.मात्र त्यांची पाठ फिरली की ये रे माझ्या मागल्या, अशी सत्य परिस्थिती असल्याची खंत मंगेश देसाई यांनी व्यक्त केली.यावेळी ठाणे परिवहन प्रादेशिक कार्यालयातर्फे आरपीजी फाऊंडेशन आणि राईज इंडियाने प्रशिक्षण दिलेल्या टू व्हीलर चालकांना अतिथींच्या हस्ते हेल्मेट देण्यात आले. सुरुवातीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभर शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजचे अध्यक्ष अतुल भागवत, माजी अध्यक्ष सचिन देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी अपर्णा पाटणे यांनी केले.