शहरांमधील मॅनहोलची झाकणे सुरक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:49 AM2019-07-15T00:49:58+5:302019-07-15T00:50:01+5:30
मुंबईमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून नुकताच एकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुरलीधर भवार
कल्याण : मुंबईमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून नुकताच एकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोखंडी झाकणे चोरी होत असल्यामुळे केडीएमसीच्या हद्दीत मॅनहोलवर सिमेंट आणि फायबरची झाकणे लावण्यात आली आहेत. महापालिकेने ही झाकणे सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी फायबरची झाकणे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे निघू शकतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
पूर्वी मॅनहोलवर लोखंडी झाकणे असत. चोरटे या लोखंडी झाकणांची चोरी करत असल्यामुळे मॅनहोल उघडे पडण्याचे प्रमाण जास्त होते. त्यावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी सिमेंटची झाकणे लावण्याचा पर्याय स्वीकारला गेला. शहरातील प्रमुख रस्ते आता सिमेंट काँक्रिटीकरणाचे असल्याने मॅनहोलवरील झाकणेही सिमेंटची आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांची झाकणे ही फायबरची आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील मॅनहोलवरील काही झाकणे फायबरची आहेत. मात्र, ही झाकणे वाहनांची जास्त रहदारी असलेल्या रस्त्यावर फार काळ टिकाव धरत नाहीत. शहराप्रमाणे २७ गावांत सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्थाच अस्तित्वात नाही. त्यामुळे अनेक गावांत पावसाचे पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर झाकण उघडे होते. बेतूरकरपाड्यातील मॅनहोलचे झाकण शनिवारी बसवण्यात आले. कल्याण स्टेशन परिसरातील संतोष हॉटेल परिसरातून दीपक हॉटेलकडे जाणारी रहदारीच्या गल्लीतील ड्रेनेज लाइन ओव्हरफ्लो होत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दुरुस्ती करून जुन्या वाहिन्या तिथेच पडल्या आहेत. शिवाजी चौकातील गटारीचे झाकण तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी फोडले. ते पुन्हा पूर्ववत त्याठिकाणी बसविलेले नाही. महापालिका हद्दीत मॅनहोलमध्ये पडून मृत्यूची घटना घडलेली नसली तरी वर्षभरापूर्वी डोंबिवली औद्योगिक परिसरातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी दुरुस्त करण्यासाठी तीन कामगार उतरले होते. त्यांचा आतमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना महापालिका हद्दीत घडली नसून ती एमआयडीसीच्या हद्दीत होती.
>महापालिकेचे दुर्लक्ष
शहरी भागांत पाऊस जास्त पडला की, सांडपाण्याच्या वाहिन्या तुडुंब भरून वाहतात. पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असला की, मॅनहोलची झाकणे निघून जातात. काही वेळा कचऱ्यामुळे पाणीवाहिन्या तुंबल्यास कामगार मॅनहोलचे झाकण काढून साफ करतात. पुन्हा त्याच पद्धतीने ते झाकण बसविले जात नाही. त्यामुळे मॅनहोल उघडेच राहतात. अनेकदा झाकणे तुटल्यावर ती बदलण्याची तसदी महापालिका घेत नाही.