नाटिकांमधून समाज कसा पुढे जातोय हे दिसतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:54 AM2019-06-04T00:54:02+5:302019-06-04T00:54:07+5:30
रत्नाकर मतकरी : नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाचा समारोप
ठाणे : वंचितांच्या रंगमंचावरील नाट्यजल्लोषात लोकवस्तीतील युवकांनी ज्या धिटाईने आणि अभ्यासपूर्णरीतीने नाटिकांमधून विषयांची मांडणी केली, त्यातून समाज कसा पुढे जातोय, हे एकीकडे दिसते आहे, तर दुसरीकडे संधी मिळताच ही वंचित मुलीमुले किती सफाईने आणि प्रभावीपणे अभिव्यक्त होत आहेत, हेही दिसते, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी वंचित कलाकार कार्यकर्त्यांना शाबासकी दिली.
रविवारी समता विचार प्रसारक संस्था आणि बालनाट्य आयोजित नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाच्या समारोपप्रसंगी मतकरी म्हणाले, वंचितांचा रंगमंच म्हणजे एरव्ही ज्या मुलांना संधी मिळत नाही, त्यांना मुक्तपणे आपले म्हणणे नाट्यमाध्यमातून मांडण्याची सोय. आपल्या आजूबाजूचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांना नेमकेपणाने भिडणे, ही गोष्ट इथल्या कलाकारांना आता छान साधायला लागली आहे. हा नाट्यजल्लोष सलगपणे न थकता वस्त्यावस्त्या पिंजून काढून समता विचार प्रसारक संस्थेचे कार्यकर्ते जी मेहनत घेत आहेत, त्याचेही मतकरींनी कौतुक केले.
ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन म्हणाले, रंगभूमीवरील हा अभिनव प्रयोग आकर्षक आणि आवश्यक आहे. मनोविकास ही थीम निवडून सादर केलेल्या नाटिका अतिशय मनोवेधक झाल्या आहेत. नाट्यलेखक मकरंद जोशी यांनी या मंचाशी आपण याआधी थेट जोडले गेलो नाही, याबाबत खंत व्यक्त करून मुलांनी प्रभावीपणे सादर केलेल्या नाटिकांमधून एकाच वेळी अश्रू आणि हसू डोळ्यांत उभे राहिल्याचे सांगितले. वंचितांचा रंगमंच ही रंगमंचीय अवकाश अधिक समृद्ध करणारी देणगी आपण रंगभूमीला दिली आहेत, असेही ते म्हणाले. समता संस्थेच्या डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी प्रास्ताविक करताना या उपक्र माचा हेतू केवळ रंगमंचीय सितारे घडवणे हा नसून, वंचित मुलांना अधिक जबाबदार आणि समृद्ध नागरिक व परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता बनवणे आहे. आयपीएचच्या वैदेही भिडे म्हणाल्या, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मनोविकास या विषयावर वस्तीवस्तीमधील मुलांशी चर्चा करून, होतकरू कलाकारांना मार्गदर्शन करून नाट्याविष्कार प्रभावी होण्यास मदत केली. यामुळे यंदाच्या नाटिका अनेक पैलूंनी संपन्न, निरनिराळ्या विषयांचे परीघ विस्तारणाऱ्या ठरल्या. सूत्रसंचालन संयोजिका हर्षदा बोरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया होते.