इट स्मार्ट सिटीज चॅलेंज : ठाण्याचा देशातील टॉप २० मध्ये समावेश; महाराष्ट्रातून निवड झालेले एकमेव शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:09 PM2021-12-15T12:09:13+5:302021-12-15T12:09:29+5:30
१०९ शहरांचा होता सहभाग
ठाणे : स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा देशातील पहिल्या २० शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड झालेली ठाणे महापालिका एकमेव ठरली आहे.
१५ एप्रिल २०२१ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत देशातील सर्व १०० स्मार्ट शहरांसह एकूण १०९ शहरांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या शहरांना मिलान अर्बन फूड पॉलिसी पॅक्ट, फूड फाउंडेशन यासह इतर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत या शहरांना आपले सादरीकरण करावे लागणार आहे. यासोबतच शहराला खाद्यपदार्थांबाबत जागरूक आणि संवेदनशील बनविण्यासाठी पुढील तीन वर्षांची रणनीती आखण्यात येणार आहे.
स्कोअरकार्ड, व्हिजन फॉर्म आणि सादरीकरणात मिळालेल्या गुणांच्या आधारे टॉप ११ शहरांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे पाहिले. अन्न परवाना, खाद्यपदार्थ नोंदणी, इट राइट कॅम्पस, इट स्मार्ट स्कूल, स्वच्छता रेटिंग, अन्न भेसळीची ऑन स्पॉट तपासणी या आव्हानांसाठी विहित केलेल्या कामांवर व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.
या शहरांची निवड
प्राथमिक निवड चाचणीत ठाणे, आग्रा, अजमेर, भोपाळ, बेंगळुरू, चंदीगड, इंदुर, जबलपूर, पणजी, पटना, राजकोट, सागर, शिमला, सुरत, तुमाकुरू, तिरुनेलवेली, बडोदा, उज्जैन, जम्मू आणि रौरकेला आदी शहरांची निवड करण्यात आली आहे.