माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरायला लागतोय एक तास
By अजित मांडके | Published: July 12, 2024 03:37 PM2024-07-12T15:37:08+5:302024-07-12T15:37:48+5:30
सर्व्हर डाऊन, ओटीपीवरुन अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा शहरातील त्या त्या भागात वास्तव्यास असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना होत आहे. यात अर्जदार महिला या आॅफलाईन पध्दतीने अर्ज भरत आहेत. तो अर्ज पालिकेच्या मदत कक्षात आल्यानंतर अंगणवाडी सेविका आॅनलाईन भरत आहेत. परंतु एक एक अर्ज भरण्यासाठी तब्बल १ ते दिड तासांचा कालावधी जात असल्याने अंगणवाडी सेविकांसह पालिका अधिकारी वर्ग हैराण झाला आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिण योजना राबविली आहे. यात प्रत्येक लाभार्थी महिलेला महिनाकाठी दिड हजार मिळणार आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीतील महिलांना देखील या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने देखील पावले उचलली आहेत. गुरुवार पासून महापालिकेने या योजनेतील महिलांचे अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. परंतु पहिल्याच दिवसापासून अर्ज भरतांना अंगणवाडी सेविकांची तारेवरची कसरत सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील महिला या आपआपल्या भागातील माजी नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन किंवा महापालिकेच्या संबधींत कार्यालयात जाऊन अर्ज घेत आहेत. त्यानंतर तो अर्ज आॅफलाईन पध्दतीने भरुन पुन्हा पालिकेच्या संबधीत मदत कक्षात आणून देत आहेत. त्यानंतर महापालिकेच्या अंगणवाडी सेविका हा अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याचे काम गुरुवार पासून करीत आहेत.
परंतु पहिल्या दिवसापासून अंगणवाडी सेविकांना आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. सर्व्हर डाऊन होणे, सर्व्हर स्लो होणे, आदी समस्यांमुळे एक एक अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी तब्बल १ ते दिड तासांचा अवधी जात आहे. परंतु आॅफलाईन पध्दतीने येणाºया अर्जांची संख्या रोजच्या रोज शेकडो असल्याने आलेले अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. त्यातही अर्ज भरुन झाल्यानंतर संबधीत अर्जदार महिलेच्या मोबाइलवर ओटीपी जात आहे. तो ओटीपी मागतांना देखील कशाला हवा ओटीपी, तुम्ही फसवणुक कराला अशा देखील तक्रारी वाढू लागल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. त्यामुळे या अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.