साकेत पुलावर यंदाही ‘खड्डे’कोंडी, अर्ध्या तासासाठी लागले दोन तास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 10:47 PM2022-07-06T22:47:02+5:302022-07-06T22:47:34+5:30
अर्ध्या तासासाठी लागले दोन तास, भिवंडीतील रांजणोलीपर्यंत वाहनांच्या रांगा
ठाणे : मुंबई-नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील साकेत पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणे शहरात बुधवारी पुन्हा गेल्या वर्षीप्रमाणेच वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती झाली होती. साकेत पूल ते ठाण्यातील आनंदनगर जकातनाका तसेच भिवंडीतील रांजनोली नाका आणि घोडबंदर मार्गावरील मानपाड्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अनेक रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवांची वाहनेही अडकून पडली होती.
वाहतूक कोंडीत अडकून वेळ वाया घालवण्यापेक्षा अनेकांनी पायपीट करीत इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग स्वीकारला. सकाळी ८ ते अगदी दुपारी ४ पर्यंत कोंडी कायम होती. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे दीड ते दोन तासांचा अवधी लागत होता. ठाण्यातील वाहन चालकांना नाशिक, नवी मुंबई किंवा भिवंडीच्या दिशेने जाण्यासाठी किंवा नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि भिवंडीकडून मुंबई किंवा ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जातात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहरात खड्ड्यांचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल हा अरुंद असून या मार्गावरही मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळेच या मार्गावरून सावकाश वाहने न्यावी लागतात. मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्याहून नाशिक, भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते मुंबई ठाण्याच्या सीमेवरील आनंदनगर जकात नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. साकेत पूल ते घोडबंदर येथील मानपाड्यापर्य़ंत वाहतूक कोंडी झाली होती. नाशिक, भिवंडी येथून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते रांजणोली नाक्यापर्यंत चालकांना अडकून रहावे लागले.
प्रवाशांत वाद, वाहतूक पोलिसांची दमछाक
वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तसेच इतरही अत्यावश्यक सेवेची वाहने अडकली होती. त्यामुळे वाहन चालकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी द्राविडी प्राणायम करावा लागला. या कोंडीमुळे रिक्षा, बस चालक आणि प्रवाशांमध्ये वादावादीच्या घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहनेही दुपारच्या वेळी खोळंबली होती. या सर्वच ठिकाणी वाहतूक नियंत्रण करतांना वाहतूक पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले.