पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे ही दुर्दैवाची बाब! गिरीश ओक यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:59 AM2021-01-31T00:59:26+5:302021-01-31T01:00:37+5:30
Traffic News : वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे.
ठाणे - वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. परदेशात गेल्यावर आपण तिथले वाहतूक नियम स्वतःहून पाळतो, पण आपल्या देशात मात्र नियमांकडे दुर्लक्ष करतो. रस्त्यावर पोलीस दिसल्यावर पटकन हेल्मेट परिधान करून नंतर पुढे गेल्यावर लगेचच काढतो, हा प्रकार दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीश ओक यांनी व्यक्त केली.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमानिमित्त महिला पुरुष बाइकरॅलीचे आयोजन केले होत. त्यावेळी बोलताना डॉ.गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे, यावर भाष्य केले. यावेळी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून ते स्वत: सामील झाले होते. शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मर्फी येथील आरटीओ कार्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला पुढे, नितीन जंक्शन, कोर्ट नाका, तलावपाळी, तीनहात नाका, पासपोर्ट ऑफिस, उपवन, हिरानंदानी इस्टेटमार्गे मर्फी ऑफिस असा ३० किलोमीटरचा टप्पा या रॅलीने पार केला.
२०० दुचाकीस्वारांनी घेतला सहभाग
रॅलीत सुमारे २०० दुचाकीस्वार सहभागी झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली. रस्ते सुरक्षा अभियान हे केवळ ठरावीक कालावधीपुरते नसून, ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळूनच कायम वाहने चालविली पाहिजेत, असा संदेश या रॅलीदरम्यान दिल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले.