"राज ठाकरेंची उत्तरसभा नव्हे तर उत्तरपूजा होती; उत्तरपूजेनंतर विसर्जन होते" जितेंद्र आव्हाड यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:38 PM2022-04-13T14:38:59+5:302022-04-13T14:41:28+5:30
Jitendra Awhad News: राज ठाकरे यांनी मंगळवारच्या सभेत ना. डॉ. आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. त्या टीकेचा ना. आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत समाचार घेतला.
ठाणे - आपण लहानपणी शिवाजी, शिवाजी खेळत होतो. तसे हे अमिताभसारखे मंचावर येतात; पण, त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालताना आपण कधी पाहिले आहे का? मंचावरील महापुरुषांना यांनी कधी एकत्रित वंदन केले आहे का? जिथे राज ठाकरे यांचे सभास्थळ होते. तिथे जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता; तिथे जाऊन वाटले नाही महाराजांना पुष्पमालिका अर्पण करावी. स्वत:ला वारसदार समजता ना? दहा मिनिटावरच डॉ. बाबासाहेबांचा पुतळा आहे; तिथे जाऊन बाबासाहेबांना मानाचा जयभीम करुन वंदन करावेसे वाटले नाही? हे कधीच राज ठाकरेंकडून कधीच घडत नाही. पण, दुसर्यावर नेहमीच बोट दाखवता. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, जशास तसे उत्तर द्या; आज हे लक्षात ठेवा राज हे जसे बोलतील तसेच उत्तर दिले जाईल. काल राज यांची उत्तरसभा नव्हती. तर उत्तरपुजा होती. उत्तरपुजेनंतर विसर्जन केले जाते. ज्याची प्रतिष्ठापना केली जाते त्याचीच उत्तरपुजा केली जाते, अशी टीका गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राज ठाकरे यांनी मंगळवारच्या सभेत ना. डॉ. आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. त्या टीकेचा ना. आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत समाचार घेतला. डॉ. आव्हाड पत्रकारांशी बोलाताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हिडीस-पिडीस बोलणे हे कोणालाही मान्य नाही. संस्कारामध्येच मान्य होत नाही. कोणाला तरी अरे तुरे असे म्हणत असतील तरी आम्ही त्यांना राजसाहेब ासेच म्हणतो. आपणावरही त्यांनी टीका केली. माझे आजोबा, माझे वडील, माझे काका असे कोणीही राजकारणात नव्हते. राज ठाकरे हे पुण्यवान आहेत; कारण, त्यांच्या पाठिशी आजोबा आणि काकांची पुण्याई आहे. मला वाटत होते की त्या पुण्याईचा ते चांगल्या पद्धतीने उपयोग करुन घेतील. पण, ते काहीच करताना दिसत नाहीत. उद्या (दि.14) डॉ. बाबासाहेबांची जयंती आहे. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी खूप वेळा बाबासाहेबांचे नाव घेतले आणि मिरवणुका जोरात काढा, असे सांगितले. पण, मंगळवारच्या भाषणात बाबासाहेबांचा साधा उल्लेखही नाही. बाबासाहेबांच्या लेकरांना जयंतीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या नाहीत., जयभीमही म्हणाले नाहीत. पवारसाहेबांनी जातीयवाद वाढविला असे राज ठाकरे म्हणाले. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला होता, हे त्यांना माहित नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला सती न जाऊ देता कर्मकांड नाकारले, हे राज ठाकरे यांना माहित नाही का? दुर्देवाने राज ठाकरे हे पुरंदरेच वाचत आहेत. अफझल खानाचा कोथळा काढला, याबद्दल प्रत्येकाला अभिमानच आहे. पण, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात त्यांच्या शरीरावर एकच वार झाला होता. हा वार करणारा अफझल खानाचा वकील कोण होता, हे राज ठाकरे का लपवत आहेत? अफझल खानाची सैनिक म्हणून त्याची कबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधली. पण, शिवरायांवर वार करणार्याचे मुंडके तलवारीवर फिरवणार्याचे नाव का सांगत नाहीत? त्याचे नाव होते, कृष्णा भास्कर कुलकर्णी! हा इतिहास का सांगत नाहीत. कोण जातीयवाद वाढवतंय? त्याच्या नंतरच्या इतिहासात काय झाले; जिंकले तर पेशवे आणि हरले तर मराठे, हा जातीयवाद कोणी निर्माण केला? अन् पेशवे नव्हते असे तुम्ही कसे म्हणू शकता? सिनेमा निघत आहेत, पेशव्यांवर! हे कधी सर्व कधी सांगणार? हिडीस-पीडीस बोलत असताना तुम्हाला इंधनाचे, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव दिसत नाहीत? त्याच्यावर काहीच बोलणार नाहीत; पण, आपल्या कार्यकर्त्यांना उजवीकडे घेऊन जायचे म्हणून काहीही बोलणार! एवढे भोंग्यांबद्दल बोलताय ना; , मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिथे सभा घेतली, तिथे सायलेन्स झोन आहे. सभेच्या एका बाजूला सेंट जॉन स्कूल आणि दुसर्या बाजूला शिवसमर्थ विद्यालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शाळांच्या आजूबाजूला कर्णे लावू नयेत, असा नियम आहे. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना हे माहित नव्हते का, सभा जिथे घेतली आहे तो सायलेन्स झोन आहे ते! राज यांच्या कार्यकर्त्यांनी का आग्रह त्याच ठिकाणाचा धरला होता.
राज यांनी वस्तरा कसा सापडेल, मुस्लीम दाढीच करीत नाहीत, असे विधान केले. पण, राज ठाकरे हे विसरले की, हाजी आराफत शेख हे आता भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आहेत. ते पूर्वी मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष होते. ते राज ठाकरे यांचे मित्र होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून राज यांनी जेवण केले आहे. ते नेहमीच साफ दाढीचे होते. मुंब्य्रात अतिरेकी सापडले, असे राज यांनी सांगितले. पण, आपण सन 2009 पासून मुंब्य्राचे प्रतिनिधीत्व करीत आहोत. पण, केवळ दोन वेळा तिथे अतिरेक्यांच्या रेकॉर्डवरील लोक सापडले; पण, तेदेखील बाहेरुन आलेले भाडेकरु होते. ते स्थानिक नव्हते. मुंब्य्रात आता एवढा बदल झाला आहे की, मुंब्य्रात आता लोक वेगळा विचार करीतच नाहीत. मुंब्रा येथे जे दहशतवादी सापडले आहेत ते भाड्याने रहायला आले होते. अतिरेकी हा जातीधर्माचा नसतो. राज ठाकरे हे कधी साध्वीवर बोलताना दिसले नाहीत. नथुराम हा देशातील पहिला अतिरेकी होता, त्याच्यावर राज कधी बोलत नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी बोलताना इतिहास पडताळून घ्यावा; आपल्या बाजूला कोण बसलेय, हे तपासावे. त्यांच्यासमोर बसलेल्या मुस्लीम कार्यकर्त्याचा उल्लेख केला, त्याने दाढी ठेवली होती का? म्हणजे तुम्ही कोण मुस्लीम देशप्रेमी आहे आणि कोण देशद्रोही, याचे सर्टीफिकेट राज ठाकरे हे देणार आहेत का?, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही इतरांच्या चेहर्यावर, नाकावर, रंगावर भाष्य करता; तुमच्यामध्ये वर्णद्वेष आणि जातीयवाद किती ठासून भरलाय, हे तुम्ही दाखवून देताय.आता जर आम्ही म्हटले की तुम्ही किती ढेरपोटे झालात; तुमचा चेहरा किती सुजलाय, तर तुम्हाला ते आवडेल का? राजकारणामध्ये वर्णद्वेष, शारीरीक व्यंगावर बोलणे हे पाप आहे. इथे मतभेद होऊ शकतात; पण, मनभेद होऊ शकत नाहीत. राज ठाकरे यांनी माझी अक्कल काढली. राज हे खूप हुशार आहेत. पण, त्यांच्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेले पुस्तक राज यांनी वाचावे. सातारच्या गादीच्या वारसांना पेशव्यांनी कसे कोंडून ठेवले होते अन् त्यांची आई प्रतापसिंह राजांना पहाटे कशी शिकवायची, हे प्रबोधनकारांनीच लिहून ठेवले आहे.
राज यांनी म्हटले की, शरद पवार हे फक्त शाहू, फुले, आंबेेडकरांचे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधून काढली. साधने नसताना केवळ अभ्यासाच्या जोरावर समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज तर त्यांचे वारसच होते. अन् हे दोघेही माझे वारस आहेत, असे म्हणत डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्यामुळे तिघांच्या रक्तात, शब्दात, कृतीत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे या तिघांचेही नाव घेणे म्हणजे शिवाजी महाराजांचे नाव घेण्यासारखेच आहे. पण, राज यांना हे समजणार नाही. कारण, त्यांना कायम फूट पाडण्याची सवय आहे. राज ठाकरे हे शिव्या घालू शकतात; आम्हीही शिव्या घालू शकतो; पण, आमच्या मातापित्याने आणि शरद पवारांनी दिलेल्या संस्कारामध्ये ते बसत नाही. वेडेवाकडे बोलणे कोणालाही जमते. पण साधारण व्यंग काढू नये, असे बोलतात. आपले बाषण आपणाला लखलाभ असो. पण, संत तुकारामांनी जशास तसे उत्तर देण्याचे शिकवले आहे. गरगर फिरवण्याची भाषा राज यांनी केली असली तरी लोक फक्त त्यांना हसत आहेत. त्यांना सामान्य माणूस ट्रोल करीत आहे. कौतूक करीत आहेत. राजकीय मंचावर एक नवा जॉनी लिवर सापडला आहे, असे आता लोकच म्हणू लागले आहेत. मलाच आश्चर्य वाटतेय की राज यांना जॉनी लिवर म्हणू लागले आहेत. ज्या प्रबोधनकार, बाळासाहेबांच्या पुण्याईवर राज मार्गक्रमण करीत आहेत; म्हणून लोक राज ठाकरे यांचे भाषण ऐकत आहेत. हे सगळे गमावून बसू नका!
राज हे इतिहास तज्ज्ञ नाहीत. उलट त्यांना आता वैफल्य आले आहे. त्यामुळे ते सर्व विसरत चालले आहेत. त्यांच्या शेजारी बसणारे दाढी न राखणारे हाजी आराफत त्यांना आठवत नाहीत. सुप्रियाताईंवर टीका करताना सुळे-सुळे असे ते म्हणाले; पण, सुळे घुसल्यावर कसा त्रास होतो, हे त्यांना माहित नाही. आम्हालाही बोलता येते. पण, आम्ही संस्कारक्षम आहोत. राजकारणात लोकांचे अश्रू पुसायचे असतात. हास्यविनोद करणारे जगात खूप आहेत. चार्ली चॅप्लीन होता; जॉनी लिवर आहे आणि राज हेदेखील आहेत. इडीच्या धाडींबद्दलही राज यांनी जावई शोध लावला आहे. येथील समाजव्यवस्था चांगली ठेवणारे प्रबोधनकार आणि खोटं सांगू राज ठाकरे प्रबोधनकारांचा वारसा जपण्याचे सोडत आहेत. प्रबोधनकारांनी लिहिलेले वाचायचे सोडून पुरंदरेंनी सांगितलेला इतिहास राज कुरवाळत आहेत. जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकातील पान क्रमांक 93 वरील चौथा परिच्छेद वाचा. त्या जेम्स लेनला ही चुकीची माहिती का दिली, यावर राज ठाकरे का बोलत नाहीत. यावर बोला, आम्ही समर्थन देऊ. गरगर फिरवीन काय, मालमत्ता आहे का?
राज यांनी पवारांना सुरक्षा देता आली नाही; पण, आपल्यावर हल्ला होणार हे पोलिसांना समजले, अशी टीका राज यांनी केली. त्यावर ते म्हणाले की, राज ठाकरे यांना काल जी सुरक्षा दिली. त्याकडे पाहता, हीच महाराष्ट्र सरकारचा मोठेपणा असतानाही त्याची टिंगल करताय?. राज यांना दंगल घडवून बहुजन समाजातील मुलांना जेलमध्येच पाठवायचे असेल तर काय करणार? पण, मुलांनी विचार करायला हवा की ते ते वर बसणार आणि तुम्ही जेलमधील फरशीवर बसणार! पण, लक्षात ठेवा दंगा करणार्यांच्या जामीनासाठी कोणताही नेता येत नाही. फक्त आईबापच जातात. नेता विचारत नाही. तेव्हा दंगा भडकवाणे सोपे आहे, याचा विचार मुलांनी करावा, असे आवाहनही ना. डॉ. आव्हाड यांनी केले.