गुरुजींनी शिक्षा केल्यानेच अधिकारी होऊ शकलो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 02:12 AM2019-09-05T02:12:57+5:302019-09-05T02:13:03+5:30
सर्वसामान्य गरिब कुटुंबातील पुंडलीक साळुंखे यांच्या आयुष्याला आकार देणारे ठाकू र गुरुजी
अलिबाग : घरची परिस्थीत अत्यंत बेताचीच होती. त्यामध्ये शिक्षण घेणे हे परवडणारे नव्हते, परंतु वडिलांची सक्त ताकीत होती शिक्षण हे घेतलेच पाहिजे, तर आईचे स्वप्न होते की मी मोठा झाल्यावर मोठा साहेब व्हावे. त्यामुळे जिद्दीने शिक्षण घेण्याचा दृढ निश्चय केला. प्रचंड मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले आणि बिडीओ (गट विकास अधिकारी) झालो. त्या दिवशी आमच्या घरात कोणाचाच आनंद गगनात मावत नव्हता. आई सर्वांना सांगत होती पुंडलीक मोठा साहेब झाला. आईच्या आनंदाला पारावार उरलेला नसल्याने माझा उर भरुन आला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदावर आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांना आणि माझ्या शिक्षकांना माझा अभिमान आहे.
गुरुजींनी मारल्याचा राग मनात होताच. पुढे आणखीन मोठा झाल्यावर माहिती घेतली की या शिक्षकांपेक्षा मोठा कोण असतो. त्याचा पगार कोण देता. त्यात असे समजले की बीडीओ (विस्तार अधिकारी) मोठा साहेब असतो. मग काय तेवढेच लक्षात ठेवले आणि बीडीओ बनायचे आणि गुरुजींनाच धडा शिकवायचा अशीच मनाशी खूणगाठ बांधली. जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि बीडीओ झालो. ठाकूर गुरुजींनी मला मारले नसते, तर आज मी बीडीओ झालो नसतो. त्यांनी मला माझ्या चुकीची शिक्षा दिली होती. मात्र मी नकळत गुरुजींना शिक्षा देण्याच्या नादात मोठा साहेब झालो होतो हे कळलेच नाही. मला मिळालेले यश हे माझ्या गुरुजींनमुळेच मिळाले आहे.
जेव्हा शिक्षक मित्र बनतात तेंव्हा...
माझ्या शिक्षणातील प्रगती पाहून ठाकूर गुरुजी आनंदी होते. मी जेव्हा बीडीओ झालो तेंव्हा ठाकूर गुरुजींनी भेटण्याचे ठरवेल. माहिती घेतल्यावर कळले की ठाकूर गुरुजी हे रसायनी येथील शाळेवर आहेत. तडक त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि प्रथम त्यांचे पाय धरले. त्यांनीही मला जवळ घेतले. आज मी त्यांना भेटतो तेंव्हा ते मला मित्रा प्रमाणेच वागवतात. यापेक्षा मोठे समाधान काय असेल.
खालापूर तालुक्यातील वावोशी येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. लहानपणापासूनच मस्ती करायचो. मी, माझा मित्र दीपक झेमसे, दीपक म्हात्रे, माई शेट्ये, आशा ओसवाल असे आम्ही रस्त्याने चालत होतो. मी चालतानाच माझ्या मित्रांसोबत मस्ती करायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्या सोबत आमचे शिक्षक दशरथ ठाकूर होते. त्यांनी मला दोन वेळा हटकले मात्र माझी मस्ती सुरुच होती. त्यावेळी त्यांनी मला रस्त्यातच मारले. गुरुजींनी मारल्याचा राग माझ्या मनात होता. त्याच रागात परीक्षा दिली आणि चांगल्या मार्कांनी पास झालो.
कसलेल्या मल्लासोबत तीन तास कुस्ती...
माझ्या खोडकर आणि मस्तीखोर स्वभावामुळे सर्वच शिक्षक हैराण होते. पिंगळे गुरुजीही त्यातीलच एक आहेत. त्यांनी माझी कुस्ती वर्गातील शांताराम पाटील याच्याबरोबर लावली. शांताराम हा कुस्ती खेळणाराच होता म्हणजे कसलेल्या मल्लासोबत पिंगळे गुरुजींनी मला झुंझवले तो मला सातत्याने खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तीन तास झाले तरी हार पत्करण्यास कोणीच तयार नव्हते. शेवटी गुरुजींनीच सामान बरोबरीत सोडवला.