ठाण्यातील १४० खासगी रुग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे झाले उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:36 AM2021-01-11T00:36:19+5:302021-01-11T00:36:34+5:30
भंडारा दुर्घटना : ठाणे अग्निशमन दलही करणार कारवाई, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ठाणे : भंडारा जिल्ह्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून राज्यात अशी अनेक असुरक्षित रुग्णालये आहेत. भंडारा जिल्ह्यासारखी पुनरावृत्ती ठाण्यातही होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाण्यातील तब्बल १४० खासगी रुग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाकडून पुन्हा अशा रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार असून त्यांना कारवाईची नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील खासगी रुग्णालयांना फायर एनओसी नसल्यामुळे अशी नामांकित १४० रुग्णालये ४८ तासांची नोटीस देऊन सील करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाला न्यायालयाने दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही सर्व रुग्णालये आजही सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी याबाबत काही कार्यकर्त्यांनी अग्निशमन अधिकारी आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली असता तीन रुग्णालये सील केली. मात्र, काही तासात ती पुन्हा खुली करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
ठाणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यासंदर्भात म्हणाले की, २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. यातील काही रुग्णालयांनी अटीशर्थींचे पालन केल्यामुळे त्यांना फायर एनओसी देण्यात आले आहे. परंतु, यातील किती जणांनी घेतले आणि किती बाकी आहेत, याचा आढावा घेतला नसल्याचीही त्यांनी कबुली दिली. तो आढावा घेण्यात येणार असून उर्वरित रुग्णालयांना पुन्हा नोटीस बजावली जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भक्कम
ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ठाणे महानगरपालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणा सक्षम आणि पुरेशा असल्याचा दावा या रुग्णालयांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयाची आगरोधक सुरक्षा यंत्रणा भक्कम असून तिची वेळेवर दुरुस्ती आणि लेखापरीक्षण केले जाते. रुग्णालयातील सर्व सिलिंडरचे फेब्रुवारी महिन्यात रिफिल केले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या येथे उपचार केले जातात. या रुग्णालयात बालकांसाठी १६ खाटांची सुविधा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.