आपल्या सवयी बदलत नाही तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण, केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे आवाहन
By मुरलीधर भवार | Published: November 4, 2023 06:20 PM2023-11-04T18:20:04+5:302023-11-04T18:20:49+5:30
Kalyan News: आपल्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण असल्याचे परखड मत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले.
- मुरलीधर भवार
कल्याण- आपल्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण असल्याचे परखड मत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले. विद्युत ठेकेदारांच्या सहकार्याने कल्याण पश्चिमेच्या अल्टीजा ते डी मार्ट चौक ते अग्रवाल कॉलेजपर्यंतच्या ६ हजार स्क्वेअर फूट भिंतीवरील वॉलपेंटिंगला आजपासून सुरुवात झाली. या प्रसंगी आयुक्तानी हे आवाहन केले.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये सर्वांचाच हातभार लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपल्या सवयी बदलल्या पाहीजेत असे सांगत एकल प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे, मोठ्या आवाजाचे फटाके न फोडण्याचे आवाहन यावेळीआयुक्त दांगडे यांनी केले.
कल्याण पश्चिमेतील या ६ हजार स्क्वेअर फूट यू टाईप वॉलपेंटिंगसाठी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत हे गेल्या ६ महिन्यांपासून प्रयत्नशील होते. मात्र त्याला काही यश येत नव्हते. त्यामुळे प्रशांत भागवत यांनी महापालिका विद्युत ठेकेदार संघटनेची बैठक घेउन त्यात ठेकेदारांना ही संकल्पना समजावून सांगितली. तसेच शहरासाठी विद्युत ठेकेदारांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्याला ठेकेदार संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देत या वॉलपेंटिंगचा खर्च करण्यास तयारी दर्शवली असून या संकल्पनेसाठी ८ लाख ८० हजार खर्च येणार आहे. अल्टीजा ते डी मार्ट चौक ते अग्रवाल कॉलेजपर्यंतच्या ६ हजार स्क्वेअर फूट भिंतीवर हे वॉलपेंटिंग केले जाणार आहे. या भिंतींवर विविध पक्षांची आकर्षण चित्रे काढली जाणार असून जेजे स्कूल ऑफ आर्टच्या १० विद्यार्थ्यांची टीम येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करणार आहे, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
या कार्यक्रमाला स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, कल्याण आयएमएचे डॉ. अश्विन कक्कर, माजी नगरसेवक सुनील वायले, जनसंपर्क विभागाचे मुख्य अधिकारी संजय जाधव, केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.