फेब्रुवारीपर्यंत आणखी तीन मेगाब्लॉक घेणार; पाचव्या-सहाव्या मार्गावरून महिन्याभरात वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:05 AM2022-01-03T07:05:58+5:302022-01-03T07:06:14+5:30
कल्याण-ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी काम करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिनाभरात पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून लोकलसेवा सुरू होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिली. रविवारच्या कामानंतर फेब्रुवारीपर्यंत आणखी तीन वेळा मेगाब्लॉक घेऊन ही सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
कल्याण-ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी काम करण्यात आले. त्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. खासदार शिंदे यांच्याकडून या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी पाचवी आणि सहावी मार्गिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वापरात येईल, अशी माहिती दिली. पुढच्या आठवड्यात याच कामासाठी आणखी एकदा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. एकूण तीन मेगाब्लॉक सहा फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.
क्रॉसिंगचा प्रश्न सुटेल
या कामामुळे लोकल त्यातही फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असतील. त्यामुळे रेल्वे स्थानकात क्रॉसिंगचा प्रश्न राहणार नाही. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होईल. या दोन मार्गामुळे शटल सेवा आणि लोकल फेऱ्या वाढण्याची आशा आहे. त्यामुळे नव्या वर्षात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल असे शिंदे यांनी सांगितले.
रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या
nअमरावती-मुंबई, नागपूर-मुंबई सेवाग्राम, नांदेड-मुंबई राज्यराणी, मुंबई-पुणे- मुंबई डेक्कन, मुंबई-जालना -मुंबई जनशताब्दी, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम, मुंबई-गदग या १ ते ३ जानेवारीदरम्यान लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या एक्सप्रेस मेगा ब्लॉकच्या कामासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे
प्रशासनाकडून देण्यात आली.
९.५ किमीची
आहे रेल्वे मार्गिका
nकळवा - दिवादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचा हा प्रकल्प ९.५ किमीचा असून, यातील खाडीवरील पूल ४.५ किमी लांबीचा आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या खाडीवरील पुलावरील रेल्वे मार्गिकांची प्रत्यक्ष चाचणी सोमवारपासून घेण्यात येणार असल्याने जुन्या पुलावरील धिम्या गतीच्या रेल्वे गाड्या नवीन पुलावरून धावतील, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
nउपनगरीय रेल्वे गाड्या साधारणपणे १०५ किमी प्रति तास वेगाने धावत असतात. परंतु आता या चाचणीदरम्यान लोकल सुरुवातीला ३० किमी प्रति तास या गतीने धावतील. नंतर ही गती वाढवत सुमारे ५० किमी प्रति तास, नंतर ७० किमी प्रति तास एवढी गती राखत अंतिम चाचणी काळात पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०५ किमी प्रति तास वेगाने धावतील, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.