कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या रिकॅलिब्रेशनसाठी लागणार तीन महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:59+5:302021-03-07T04:36:59+5:30
डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम ...
डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम पूर्ण होईस्तोवर ३१ मेपर्यंतची डेडलाइन आहे. तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगून प्रवाशांना योग्य ते भाडे आकारून वाद, संभ्रम टाळण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
चव्हाण यांच्या माहितीनुसार, आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर अपडेट केले जातील. त्यासाठी आवश्यक त्या सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली येण्यास पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. मंगळवारी ते मुंबईतून मिळेल, त्यानंतर त्याचे काम करणाऱ्या संबंधितांना ते देण्यात येईल, त्याचे वाटप झाल्यावर अंतिमतः अंमलबजावणीची चाचणी झाल्यानंतर त्यास गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगणे गरजेचे आहे. आरटीओ तसेच रिक्षा युनियन, आदींनी काही प्रमाणात गुरुवारी टेरिफ कार्डचे वाटप करण्याचे नियोजन केले. तरीही ज्या रिक्षाचालकांना संगणकाद्वारे ऑनलाईन साक्षांकित केलेले टेरिफ कार्ड काढता येत असेल, ते काढून त्यांनीच प्रवाशांना मार्गदर्शन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
आरटीओने असे आवाहन केलेले असतानाच काही प्रवाशांनी मात्र जोपर्यंत रिक्षांच्या मीटरची रिकॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या रिक्षाचालकांना सुधारित भाडे देऊ नये, असे आवाहन सहप्रवाशांना केले आहे.