शिक्षकांच्या प्रतीक्षेत आयटीआय विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:32 AM2019-11-30T00:32:26+5:302019-11-30T00:32:49+5:30
शहापूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थी शिक्षकाविना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहापूर : शहापूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थी शिक्षकाविना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंप आॅपरेटर कम मेकॅनिक या ट्रेडसाठी आयटीआयमध्ये १८ विद्यार्थ्यांनी जून, जुलैमध्ये प्रवेश घेतला. आता पाच महिने झाले तरीही अजून या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक उपलब्ध होऊ शकले नाही. या ट्रेडला असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तातडीने आयटीआयमध्ये शिक्षक नियुक्ती झाली नाही तर श्रमजीवी संघटना आंदोलन करेल असा इशारा प्रकाश खोडका यांनी दिला आहे.
एकीकडे बेरोजगारी वाढली आहे, तरु ण औद्योगिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार शोधण्यासाठी धडपडत आहेत. त्यात अशा प्रकारच्या बेजबाबदार भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान खपवून घेणार नाही असा संताप विवेक पंडित यांनी व्यक्त केला. शहापूर आयटीआय ही नामांकित औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत बहुतांश आदिवासी विद्यार्थी औद्योगिक शिक्षण घेत आहेत. यात पंप आॅपरेटर कम मेकॅनिक या ट्रेडला १८ विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने दाखल झाले. मात्र आज पाच महिन्यात त्यांना एकही दिवस शिक्षण मिळाले नाही. मधल्या काळात संघटनेने आवाज उठवला तेव्हा २ ते ३ दिवस एक शिक्षक शिकवायला आले. मात्र ते गेले ते परत आलेच नाही. याबाबत पंडित यांनी माहिती मिळताच तातडीने संघटनेचे कार्यकर्ते खोडका यांना आयटीआयमध्ये पाठवले आणि परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घ्यायला सांगितले.
दोन दिवसांत शिक्षक हजर होतील
याबाबत प्राचार्य एम एन मथुरकर यांच्याकडे विचारणा केली असता शिक्षकासाठी एक अर्ज आला आहे. दोन दिवसात शिक्षक हजर होतील असे त्यांनी सांगितले.