घन काल बरसले अनावर हो...

By admin | Published: June 11, 2017 03:19 AM2017-06-11T03:19:17+5:302017-06-11T03:19:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे अक्षरश: तृप्त केले. सोसाट्याचा

It's been tense for years. | घन काल बरसले अनावर हो...

घन काल बरसले अनावर हो...

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे अक्षरश: तृप्त केले. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट, तुफान वृष्टी आणि जलमय परिसर असे दृश्य ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरांत होते.
शनिवारी दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, हवेत आलेल्या गारव्यामुळे समाधानाचे वातावरण होते. शनिवारी दुपारपर्यंत ठाणे शहरात ७७.५० मिमी पाऊस झाला. रात्रभर झालेल्या पावसात ११ झाडे कोसळली, तर ५ ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी पोहोचून कोसळलेली झाडे हलवली व साचलेल्या पाण्याचा निचरा केला.
केरळमध्ये चार दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून कोकणातून पुढे सरकत नसल्याने ठाणेकर उकाड्याने कातावले होते. गेल्या काही दिवसांत पावसाच्या अगदीच किरकोळ शिडकाव्यामुळे उलट आणखी घामाघूम व्हायला झाले. शुक्रवारी रात्री अचानक मुसळधार वृष्टी सुरू झाली. साधारण साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाच्या धारांनी रात्री साडेबारा ते दीड अक्षरश: रस्त्यावर तांडव केले. या एक तासात १९.४० मिमी पाऊस झाला. सकाळी ६.३० पर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर, हळूहळू पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर, शनिवारी दिवसभर शहरात पाऊस नसला, तरी वातावरण ढगाळ होते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण ३९ तक्रारी प्राप्त झाल्या. यात ११ ठिकाणी झाडे कोसळली, तर तीन ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्याच्या तक्रारींचा समावेश होता. याखेरीज, पाच ठिकाणी पाणी साचणे, दोन ठिकाणी किरकोळ आग लागणे, चार ठिकाणी शॉर्टसर्किटसह इतर १३ तक्रारी प्राप्त झाल्या. बाळकुमपाडा क्र. १, महागिरी कोळीवाडा, मुंब्रा जामा मशीद, वाघोबानगर, कळवा, कादर पॅलेस, कौसा या पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तसेच, विकास कॉम्प्लेक्स, कोर्टनाका, मनीषानगर कळवा, सह्याद्री शाळा कळवा, ठाणा कॉलेजसमोर, शिवकृपानगर वाघबीळ, गांधीनगर पोखरण, राणा टॉवर कळवा, सहकार बाजार कळवा, गोल्डन पार्क कॅसल मिल या १० ठिकाणी झाड कोसळण्याच्या, तर वसंतलीला वाघबीळ, रघुनाथनगर वागळे इस्टेट, कोलबाड या तीन ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या.


ठाणे शहरात ७७ मिमी, तर उल्हासनगरमध्ये ६६.६ मिमी पावसाची नोंद झाली. या खालोखाल भिवंडी परिसरात ५६.६, मुरबाड तालुक्यात ४०.१२ आणि मुरबाड तालुक्यात २० मिमी पाऊस पडला. या पावसादरम्यान कोठेही अनुचित घटना घडली नाही. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ४६२.५३ मिमी पाऊस पडला. आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस शहापूरला १९१ मिमी, तर मुरबाडला ११४ आणि भिवंडीला ९२ मिमी पाऊस पडला आहे.

यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली
अनगाव : पावसाचे पाणी इमारतीच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यात साचल्याने यंत्रमाग कारखान्याच्या दुमजली इमारतीची भिंत कोसळली. ही घटना शेलार येथील लक्ष्मी कम्पाउंडमध्ये घडली. यात जीवितहानी झाली नाही. पहिल्याच पावसामुळे ही घटना घडल्याने यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील लक्ष्मी कम्पाउंड येथे यंत्रमाग कारखाना आहे. त्याच्या भिंतीजवळ इमारतीच्या बांधकामाकरिता खड्डे खोदण्यात आले आहे. या खड्ड्यात दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी भरल्याने ते पाणी कारखान्याच्या भिंतीमध्ये झिरपले.
शुक्रवारी रात्री कारखान्याची भिंत खचून ती लूमवर कोसळली. यामध्ये लूमसह वर ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाले. गणेश अग्रवाल यांच्या मालकीचा हा कारखाना आहे, अशी माहिती खारबाव मंडळ अधिकारी महेश चौधरी यांनी दिली. संबंधित कंत्राटदार भिंत बांधून देणार असल्याचे त्यांनी पंचायतीच्या सदस्यांना सांगितल्याचे सरपंच घनश्याम भोईर म्हणाले.

Web Title: It's been tense for years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.