याला म्हणतात नशीब! कोरोनावर मात करून बाहेर काय आला; व्यावसायिक पाच कोटींची लॉटरी जिंकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:10 AM2021-04-23T01:10:19+5:302021-04-23T01:24:09+5:30
कोरोनावर मात केल्यानंतर सुखद धक्का , दिवा-दातिवली रस्त्याजवळील ओमकार सदन या इमारतीमध्ये आई, पत्नी आणि दोन मुलांसह राजकांत राहतात. उद्योजक पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी पंजाब राज्यातील लॉटरीची १०० रुपयांची १० तसेच ५०० रुपये किमतीची दोन तिकिटे अशी एकून दोन हजार रुपयांची १२ तिकिटे ऑनलाईन खरेदी केली होती.
कुमार बडदे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : कोरोनाच्या आजारातून घरी परतलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिव्यातील एका लघुउद्योजकाला तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याने सुखद धक्का बसला आहे. कोरोनामुळे अनेक व्यावयासिक, उद्योजक, नोकरदार आर्थिक अडचणीत आले असताना लॉटरीने मालामाल झालेले राजकांत पाटील व त्यांचे कुटुंबीय यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
दिवा-दातिवली रस्त्याजवळील ओमकार सदन या इमारतीमध्ये आई, पत्नी आणि दोन मुलांसह राजकांत राहतात. उद्योजक पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी पंजाब राज्यातील लॉटरीची १०० रुपयांची १० तसेच ५०० रुपये किमतीची दोन तिकिटे अशी एकून दोन हजार रुपयांची १२ तिकिटे ऑनलाईन खरेदी केली होती. यातील ५०० रुपये किमतीच्या एका तिकिटीला बक्षीस लागले आहे. वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी लॉटरीचा निकाल लागला (१९ एप्रिल), त्याच दिवशी दुपारी पाटील कोरोनावर उपचार घेऊन बरे होऊन घरी आले होते. त्यामुळे त्यांच्या अंगात त्राण नव्हते. मात्र, आपल्याला थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे कळल्यानंतर त्यांच्या आनंदला पारावार उरला नाही. लॉटरी लागल्याचे कळल्यावर सर्वप्रथम त्यांचा विश्वास बसला नव्हता. कोणीतरी मस्करी करत असेल असे समजून त्यांनी पहिल्यांदा फोन कट केला. त्यानंतर काही क्षणांनी पुन्हा त्यांना बक्षीस लागल्याचा फोन आल्यानंतर त्यांची खात्री पटली. नशीब आजमावायचे म्हणून कधीतरी लॉटरी काढण्यास हरकत नाही; परंतु आहारी जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.
कायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणार
कोरोना महामारीने अनेक जण बेरोजगार झाले, व्यावसायिकदेखील डबघाईला आल्यामुळे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील आयुष्य कसे जगायचे, संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशी चिंता हजारो कुटुंबांना सतावत आहे.
अशा वेळी लागलेल्या या बक्षिसामुळे पाटील कुटुंबाला निश्चितच आनंद झाला असून, बक्षिसातून मिळणारी रक्कम भविष्यात कायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतविण्याचा मानस असल्याची माहिती पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.