मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:02 AM2022-07-08T08:02:38+5:302022-07-08T08:02:51+5:30

पायवाट तुडवत गाठले आरोग्य केंद्र; ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार

It's time to dump her and move on | मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

Next

रवींद्र साळवे 

मोखाडा : दिवसागणिक रस्तेविकासाचे जाळे विस्तारत ‘समृद्धी’सह विविध महामार्ग प्रगतिपथावर नेणाऱ्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो-मेट्रो, बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही आदिवासींना रस्त्याअभावी डोंगरमाथ्याची बिकट वाट तुडवावी लागत आहे, ही शोकांतिका आहे. त्यातूनच रस्त्याअभावी मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना उपचारासाठी डोलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. मात्र, अशीच वेळ भविष्यात कुणावर आली तर काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. 

पालघरमधील मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना मंगळवारी उलट्यांचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारीही त्यांना त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात नेण्यासाठी एकच धावपळ उडाली. मात्र, रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील काही ग्रामस्थांनी बुधवारी (दि. ६) प्लास्टिकसह कापडाची डोली करून चार किलोमीटरची डोंगरवाट तुडवत मोठ्या जिकिरीने त्यांना बेलपाडा येथील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. पुढे ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे गंगाराम फसाळे यांनी संस्थेच्या वतीने स्वखर्चातून त्यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोविंद वाघ, जयराम किरकिरे, हनुमंत वाघ, विलास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे किरकिरे यांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रस्ता नसल्याने  ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. सरकारने तातडीने रस्ता बनवावा अशी मागणी परिसरातून सतत केली जात आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया कोसो दूरच !
डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे; परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र ‘विकास’ या संकल्पनेत अद्याप आलेला दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षाच आहे.

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किलोमीटरवर, तर मोखाडा तालुक्यापासून ३० ते ३५ किलोमीटरवर दरी-डोंगरांत वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतीतील ४६ घरे असलेल्या २२६ लोकवस्तीच्या मरकटवाट येथील आदिवासींना सोयीसुविधांविना, रस्त्यांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मरकटवाडीला जायला रस्ता नसल्याने चार किलोमीटरची डोंगरमाथ्याची पायवाट तुडवत ये-जा करावी लागत आहे; त्यामुळेच केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. 

Web Title: It's time to dump her and move on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.