जावयाच्या हत्येप्रकरणी सासू अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:43 AM2017-07-29T04:43:41+5:302017-07-29T04:43:46+5:30
मुलीला झालेली जुळी मुले जावयाने सासरवाडीहून जबरदस्तीने नेल्याच्या रागातून, सासूने जावयाची गळा आवळून हत्या केल्याची घटना गुरुवारी डोंबिवलीत घडली.
डोंबिवली : मुलीला झालेली जुळी मुले जावयाने सासरवाडीहून जबरदस्तीने नेल्याच्या रागातून, सासूने जावयाची गळा आवळून हत्या केल्याची घटना गुरुवारी डोंबिवलीत घडली. या प्रकरणी सासू अनिता वळंदेला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली. कल्याण न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
रवी सोलंकी (२५) पश्चिमेतील ठाकूरवाडीत फुलेनगर झोपडपट्टीत राहतो. त्याचे लग्न दोन वर्षांपूर्वी मुंब्रा रेतीबंदर येथील सोनाबाईशी (२३) झाले. बाळंतपणासाठी ती १० महिन्यांपासून माहेरी आली होती. तिला चार महिन्यांपूर्वी जुळी मुले झाली. बाळंतपणानंतर पत्नीला घरी आणण्यासाठी रवी गुरुवारी मुंब्रा येथे गेला होता. मात्र, पत्नीने येण्यास नकार दिला. त्यामुळे रवी मुलांना घेऊन डोंबिवलीच्या घरी परतला.
रवी व त्याच्या घरातील मंडळी रात्री जेवण करण्याच्या तयारीत होती. त्याच वेळी त्याची सासू अनिता व पत्नी सोनाबाई या त्याच्या घरी हजर झाल्या. रवीशी त्यांचा वाद झाला. याच वेळी पत्नी सोनाबाई ही मुलांना घेऊन घराबाहेर पळाली. घरात उपस्थित असलेली सासू अनिताने रवीचा गळा आवळून त्याला ठार मारले.