शिवमंदिरांमध्ये ‘जय भोलेनाथ’चा गजर
By admin | Published: February 25, 2017 03:09 AM2017-02-25T03:09:33+5:302017-02-25T03:09:33+5:30
महाशिवरात्रानिमित्त पुरातन खिडाकाळेश्वर मंदिर, पिंपळेश्वर, शिवमंदिर, दिवानजीकच्या म्हातर्डेश्वर तसेच शहरांतील विविध मंदिरात शुक्रवारी ‘जय भोलेनाथ’चा गजर घुमला
डोंबिवली : महाशिवरात्रानिमित्त पुरातन खिडाकाळेश्वर मंदिर, पिंपळेश्वर, शिवमंदिर, दिवानजीकच्या म्हातर्डेश्वर तसेच शहरांतील विविध मंदिरात शुक्रवारी ‘जय भोलेनाथ’चा गजर घुमला. खिडाळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टने दूधाऐवजी फुलांचा अभिषेक करून एक आदर्श निर्माण केला. यामुळे शेकडो लीटर दूधाची नासाडी टळली, असे मंदिरातील वासुदेव पाटील यांनी सांगितले.
महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरामध्ये सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उन्हाचा काडाका वाढल्याने अनेक मंदिरांबाहेर मंडप घालण्यात आला होता. खिडकाळी मंदिरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता पूजा व नंतर आरती झाली. तर काही भक्त गुरुवारी सायंकाळीच कावड घेऊन मंदिर परिसरात दाखल झाले होते. रात्रभर त्यांनी महादेवाचा जयघोष करत भजन, कीर्तन केले. मंदिर ट्रस्टने अभिषेकासाठी दूधाऐवजी फुले वापरण्याचे आवाहन केल्याने फुले व बेलाला जास्त मागणी होती.
महाशिवरात्रीनिमित्त येथे दोन लाख भाविक दर्शन घेतात. त्यासाठी मंदिर ट्रस्टने रांग, चप्पला, गाभारा दर्शनाची विशेष व्यवस्था केली. तसेच पाणी, चहा, खिचडीचे मोफत वाटप केले. जत्रेतही अलोट गर्दी झाली होती. त्याच्या नियंत्रणासाठी ट्रस्टचे सुमारे २०० कार्यकर्ते तीन दिवस अहोरात्र झटत होते, अशी माहिती सचिव बाळकृष्ण पाटील व उपाध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली. त्याचबरोबर भाविकांसाठी अमित बनसोडे यांच्यातर्फे खिचडीचे वाटप झाले. पंढरीनाथ पाटील यांनी मंदिर व परिसरात संपूर्ण विद्युत रोषणाई केली.
तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या सागावच्या पिंपळेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजेल्यापासून अखंड हरिनाम भजनास प्रारंभ झाला. त्यांची सांगता शनिवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. मंदिर परिसरात ठाणे
जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य निदान शिबिर झाले. त्यात नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.
याशिवाय कोपरगाव येथील नागेश्वर, पूर्वेतील शिवमंदिर, पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील शिवमंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. गंगा गोरजेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शनास प्रारंभ
महाशिवरात्री निमित्ताने श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान मढ, पाचवा मैल कांबा, वासुंद्री व टिटवाळा येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. रात्रीपासूनच मंदिरात ‘बम बम बोले’चा जय घोष घुमत होता.
श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर मंदिरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून एका कारंजातून शिवलिंगावर अभिषक करण्यात आला. ते पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. काही भाविकांनी रात्रीच काळू नदीच्या पात्रात आंघोळ करून गंगा गोरजेश्वराचे दर्शन घेतले. कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे, मुंबईतून तेथे भक्त आले होते. तसेच पातवा मैल, वासुंद्री व टिटवाळा येथील भाविकांनी गर्दी केली होती.
बर्फाचे शिवलिंग
कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील मंदिरात तीर्थक्षेत्र अमरनाथप्रमाणे ३० फूट उंचीच्या बर्फाच्या शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी
केली होती. उद्योजक संजय गायकवाड, संजय मोरे, संजय शिर्के यांनी यावेळी दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर, गायक, संगीतकार दीपक उत्तेकर यांचा
‘गौरव महाराष्ट्रा’चा हा कार्यक्रम झाला. विठ्ठलवाडी येथील निळकंठेश्वर, तीसगाव येथील शिवमंदिर, जिमीबाग येथील
दत्तमंदिर, तानाजी चौक येथील जय पिंपळेश्वर शिवमंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. (प्रतिनिधी/वार्ताहर)