महापौर चषक भजन स्पर्धेत जय हनुमान मंडळ विजेते; २० मंडळांनी घेतला सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:42 PM2021-01-28T23:42:05+5:302021-01-28T23:42:27+5:30
ठाणे महापालिकेने आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आर्य क्रीडा मंडळ येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
ठाणे : ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत एकूण २० भजनी मंडळे सहभागी झाली होती. यात २० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मुरबाड येथील जय हनुमान प्रासादिक मंडळाने पटकाविले. तर १५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक सुरताल भजनी मंडळ, नारंगी यांनी आणि १० हजार रुपयांच्या तृतीय पारितोषिकावर कर्जतच्या नादब्रह्म भजनी मंडळाने आपले नाव कोरले. स्पर्धेत पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे संतकृपा भजनी मंडळ, विटावा व श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड यांनी पटकाविले.
ठाणे महापालिकेने आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आर्य क्रीडा मंडळ येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. तिचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृहनेते अशोक वैती, क्रीडा आणि समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा त्याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
वैयक्तिक पारितोषिके
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये कल्पेश शिंगोळे यांनी उत्कृष्ट पखवाजवादक, सिद्धेश चव्हाण यांनी उत्कृष्ट झांजवादक, सर्वेश पांचाळ यांनी उत्कृष्ट तबलावादक, भूषण देशमुख यांनी उत्कृष्ट गायनाचे तर मकरंद तुळसकर यांनी उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून बक्षीस मिळवले.
या प्रत्येकास पाच हजारांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून पं. भीमसेन जोशींचे शिष्य नंदकुमार पाटील हे होते. नितीन वर्तक व भूषण चव्हाण यांनीही परीक्षण केले.