आवश्यकता पडल्यास कारागृहातील कैद्यांनाही मिळू शकतो मोफत वकील- न्या. बंबार्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:22 PM2017-12-10T21:22:22+5:302017-12-10T21:35:07+5:30
सर्व कैद्यांनी सन्मार्गासाठी प्रेरित झाले पाहिजे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, असे सांगून महिला कैद्यांच्या मनात ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी चांगलेच अंजन घातले. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कार्यक्रमात न्या. बंबार्डे यांनी हे मार्गदर्शन केले.
ठाणे: कैद्यांनाही कायदेविषयक सहाय्य मिळते, जर आर्थिक कुवत नसेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांनाही मोफत वकील मिळू शकतो. अर्थात, कैद्यांनीही बाहेर पडल्यानंतर सन्मार्गाला लागावे , असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील महिला बंद्यांसाठी आयोजित एका कार्यक्रमात रविवारी केले.
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्ताने १० डिसेंबर रोजी महिला बंद्यासाठी ‘मानवी हक्क व कर्तव्य’ या विषयावर एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कारागृहाच्या वतीने केले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. न्या. बंबार्डे यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन कैद्यांचे हक्क आणि कर्तव्य तसेच त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव करुन दिली. शासनाकडून कैद्यांना कोणते कायदेविषयक सहाय्य मिळते, त्यांनाही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील कसा मिळू शकतो, याची माहिती दिली. केंद्रीय तसेच राज्यस्तरीय मानवी हक्क आयोय यांचे उपयोग आणि महत्वही त्यांनी यावेळी विशद केले. एक अफ्रिकन महिला कैदी अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पकडली गेली होती. तिचे मनपरिवर्तन झाल्यामुळे तिने नायजेरियन दूतावासातील हाऊसद्वारे परवानगी घेऊन नायजेरियन मुलांना मराठी शिकविणे, त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे, अशा चांगल्या उपक्रमांचा अवलंब केला. शिवाय, मुळ देशात न पाठविण्यासाठी न्यायालयालाच तिने विनंती केली. कारण तिकडे गेल्यानंतर अंमली पदार्थांचे तस्कर पुन्हा आपल्याला त्याच कामात ओढतील, अशी तिला भीती होती. तिने जसा सन्मार्गाचा अवलंब केला, तसाच सर्व कैद्यांनी सन्मार्गासाठी प्रेरित झाले पाहिजे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, असे सांगून महिला कैद्यांच्या मनात त्यांनी चांगलेच अंजन घातले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनीही कैद्यांचे हक्क तसेच मानवी हक्क याविषयी मार्गदर्शन केले. सकाळी ११ ते दुपारी १२ या दरम्यान झालेल्या या कार्यकमास सुमारे ९० महिला बंदी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. एम. मोरे, वरीष्ठ तुरुंग अधिकारी शिवशंकर पाटील, महिला अधिकारी पिराले, अॅड. उषाकिरण पॉवेल आणि अॅड. नंदिता महाडीक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मुटकळे (गुरुजी) यांनी केले.