ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:00 AM2017-09-27T04:00:22+5:302017-09-27T04:00:31+5:30
ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून हा समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे.
ठाणे : ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून हा समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात नवकार मंत्रजप कार्यक्रमात काढले. यावेळी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मुनिवर्य जयप्रभ विजयजी (जे. पी. गुरु जी) यांनी त्यांचा गौरव करून मुक्तकंठाने प्रशंसा केली.
यावेळी ठाणे व मुलुंड परिसरातील हजारो जैनबांधव उपस्थित होते. जितोच्या ठाणे शाखेच्या स्थापनेवेळी ठाण्यातील हाजुरी येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्रासाठी तर उथळसर येथे शाळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याची पूर्तता केल्याबद्दल जैन मुनींच्या उपस्थितीत त्यांचा गौरव केला.
यावेळी शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय सुविधा केंद्राच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. येत्या चार महिन्यांत हे वैद्यकीय सुविधा केंद्र ठाणेकरांच्या सेवेत रु जू होणार आहे तर ठाणे महापालिकेच्या पुढील महासभेत शाळा उभारणीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. कार्यक्र माला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, आ. रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे जितोचे अध्यक्ष महेंद्र जैन, जितोचे सर्व पदाधिकारी व एमसीएचआय-क्रेडाइचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवर उपस्थित होते.
जे. पी. गुरु जींचे गौरवोद्गार
मुनिवर्य जे. पी. गुरु जी यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी जागवताना शिंदे यांच्यात आनंद दिघे यांचा भास होत असल्याचे गौरवोद्गार काढले. दिघे यांचा सहकार्याचा वारसा शिंदे पुढे चालवत असल्याचे गुरु जी म्हणाले.