ठाण्याच्या विकासात जैन समाजाचे योगदान मोलाचे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 08:19 PM2017-09-24T20:19:41+5:302017-09-24T20:19:55+5:30
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे उपस्थित होते. ठाण्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मुनिवर्य जयप्रभ विजयजी (जे. पी. गुरुजी) यांनी पालकमंत्र्यांचा गौरव करताना त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी ठाणे व मुलुंड परिसरातील हजारो जैनबांधव उपस्थित होते.
जितोच्या ठाणे शाखेच्या स्थापनेवेळी ठाण्यातील हाजुरी येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्रासाठी तर उथळसर येथे शाळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी जितोच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. आश्वासनाची पूर्तता केल्याच्या निमित्ताने रविवारी जैन समाजातील मान्यवर मुनींच्या उपस्थितीत मंत्रिमहोदयांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय सुविधा केंद्राच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. येत्या चार महिन्यांत हे वैद्यकीय सुविधा केंद्र ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. तर ठाणे महापालिकेच्या पुढील महासभेत शाळा उभारणीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे जितोचे अध्यक्ष महेंद्र जैन, जितोचे सर्व पदाधिकारी व एमसीएचआय-क्रेडाइचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवर उपस्थित होते.
जे. पी. गुरुजींचे गौरवोद्गार-
दरम्यान, मुनिवर्य जे. पी. गुरुजी यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी जागवताना शिंदे यांच्यात आनंद दिघे यांचा भास होत असल्याचे गौरवोद्गार काढले. आनंद दिघे यांचा सहकार्याचा वारसा शिंदे पुढे चालवत असल्याचे गुरुजी म्हणाले.
वैद्यकीय सुविधा केंद्रात काय?
*हजुरी येथे 1200 चौरस मीटर भूखंडावर उभारणी
*12 हजार चौरस फुटांच्या वास्तूचे बांधकाम पूर्ण
*यलिसिससारखे महागडे उपचार स्वस्तात उपलब्ध
*चार महिन्यांत कार्यान्वित होणार
ठाणे-मुलुंड परिसरातील रुग्णांसाठी उपयुक्त-
ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून जैन समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे.
– एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे