ठाण्यात प्रथमच भरणार ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा, मराठी ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 04:35 PM2019-04-20T16:35:49+5:302019-04-20T16:44:06+5:30
गोल्डा मेयर यांच्या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार उपस्थित राहणार आहेत.
ठाणे : ठाण्यात प्रथमच ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा भरणार आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स बुक्स आयोजित सुप्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर लिखित "गोल्डा: एक अशांत वादळ" या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे भारतातील वाणिज्य दूतावासातील उप- मुख्याधिकारी निमरोद कलमार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाण्यात राहणारे जु धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा भरणार आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालयाने ठाणे शहराला विविध कार्यक्रम आयोजित करून ठाणे शहराला बौद्धिक मेजवानी दिली आहे. तसेच वाचकांसाठी देखील अनेक उपक्रम राबवले आहेत. मंगळवारी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करून एक नवीन पायंडा मराठी ग्रंथ संग्रहालय घालत आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने इस्त्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे लेखन सुप्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर यांनी केले आहे. "गोल्डा: एक अशांत वादळ" या शिर्षकाच्या या पुस्तकाचे सुप्रसिध्द मुक्त पत्रकार निळू दामले यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला इस्त्रायलचे उप-मुख्याशिकारी निमरोद कलमार हे उपस्थित राहतील, यावेळी ठाणे शहरात शेकडो वर्षापासून वास्तव करणारे जू धर्मिय मराठी भाषिकांचा प्रथमच साहित्यिक-सांस्कृतिक मेळा भरणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने शहरातील ज्यू धर्मिय मराठी भाषिक एकाच छताखाली येणार आहेत. मंगळवार, दि. २३ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता, नेताजी सुभाष पथ, ठाणे(पश्चिम) येथे होणार्या या विनामूल्य कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इंडस सोर्स बुक्सच्या प्रकाशिका सोनवी देसाई, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह संजय चुंबळे, महादेव गायकवाड, चांगदेव काळे, अनिल ठाणेकर यांनी केले आहे.