झालं झिंग झिंग झिंगाट... गाण्यावर मुलांनी धरला ठेका; माहोल सैराट झाला
By जितेंद्र कालेकर | Published: January 22, 2023 10:36 PM2023-01-22T22:36:14+5:302023-01-22T22:36:34+5:30
मुंबई-ठाण्यातील ११०० विशेष मुलांनी लुटला ट्रायम्प रनचा आनंद
जितेंद्र कालेकर
ठाणे : कोणी दौडमध्ये भाग घेतलाय तर कोणी झिंग झिंग झिंगाटच्या गाण्यावर ताल धरलाय. काही जण पिज्झा आणि पावभाजीची चव चाखण्यात दंग झाले. रोटरी क्लब आॅफ ठाणे हिल्स आणि ट्रायम्प फाउंडेशनने ठाण्यात रविवारी आयोजित केलेल्या ट्रायम्प रन या विशेष मुलांसाठीच्या कार्यक्रमातील या दृश्याने विशेष मुलांच्या पालक आणि शिक्षकांनाही मोठा आनंद मिळवून दिला.
ठाण्यातील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरीचे जिल्हा प्रांतपाल कैलास जेठानी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ४० शाळांमधील ११०० विशेष मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १०९ कर्णबधिर तर ९०० गतिमंद आणि इतर अशा मुलांसह ३०० ते ४०० पालकांचा यात सहभाग होता.
गेल्या २२ वर्षांपासून आयोजित होत असलेल्या मेळाव्यात फन आणि एंटरटेनमेंट झोनने मुलांचे लक्ष वेधले होते. यात विशेष मुलांना खेळात सहभाग घेता येतील, अशा लहान खेळांची रेलचेल असल्याने त्यांनी याचा मनमुरादपणे आनंद घेतला. यामध्ये वयोगटानुसार मैदानी खेळ आणि स्पधार्ही घेण्यात आल्या. मार्च पासने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मैदानी खेळांबरोबरच टॅटू काढणे, हेअर बिडिंग, रायफल शूटिंग आणि फन झोन असे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होते. बदलापूरच्या प्रगती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी भेटवस्तूही देण्यात आली. रोटरीचे अध्यक्ष जयराम मेंडन, सचिव समीर लिमये, सदस्य हर्षद दिवेकर आदी बहुसंख्य स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहभाग घेतला होता.
माझ्या दक्ष या दहा वर्षांच्या मुलाने या मेळाव्यातील बॉल फेकण्याच्या स्पर्धेत बक्षीस मिळविले. या कार्यक्रमाने पालक म्हणून माझाही उत्साह वाढविला.
रेश्मा कालू, पालक, ठाणे