जळगावच्या विद्यार्थिनींनी ‘लम्पी’वर शोधला घरगुती उपाय
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 19, 2022 12:38 PM2022-12-19T12:38:25+5:302022-12-19T12:39:16+5:30
बालविज्ञान संमेलनात प्रकल्पाचे सादरीकरण
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : राज्यात लम्पी आजाराने थैमान घातले असताना अडीच हजारांहून अधिक जनावरे संक्रमित झाले होते. या आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील खिरोदा गावातील नववीच्या विद्यार्थ्यांनी घरगुती उपचार शोधून काढला. लम्पी होऊ नये,यासाठी स्प्रे तर जखम झाल्यावर लेप हे दोन्ही घरगुती उपायांचा त्यांनी शोध लावला. खिरोदा गावातील घरांमध्ये सर्वेक्षण केल्यावर जनावरांना या उपायांचा फायदा झाल्याचा दावा या विद्यार्थिनींनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
धनाजी नाना विद्यालय या शाळेच्या श्रेया चौधरी आणि महेक तडवी या विद्यार्थिनींनी भारती बढे या शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली ‘जनावरांच्या लम्पी आजारावर घरगुती उपाय’ या विषयावर प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प त्यांनी कळवा येथील सहकार विद्यालयात आयोजित केलेल्या बालविज्ञान संमेलनात सादर केला. श्रेया आणि महेक यांनी सांगितले की, खिरोदा गावात ज्यावेळी लम्पीची साथ मोठ्या प्रमाणात आली, त्यावेळी अनेक जनावरांचे बळी गेले. तर काहींमध्ये हा आजार संक्रमित झाला. त्यावेळी या आजारावर घरगुती उपाय शोधता येईल का असा विचार केला. हळद चंदनपावडर,शहद,नारळ तेल यापासून लेप तर कापराच्या वड्या, मस्टर्ड तेल, डिझेल यापासून स्प्रे तयार केला. जिथे जनावरे जिभेने स्पर्श करू शकत नाही अशा भागांनाच स्प्रे मारण्यात आला आणि लम्पी या आजारामुळे झालेल्या जखमांवर लेप लावण्यात आला.
लेप लावल्यानंतर ही जनावरे दोन ते तीन दिवसांत बरे झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. खिरोदा गावातील २५ घरांमधील जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे आढळल्याचे श्रेया आणि महेक या विद्यार्थिनींनी सांगितले.
ही होती लक्षणे
जनावरांमध्ये जास्त प्रमाणात ताप येणे, अशक्त वाटणे, तोंड सुजणे, पाय सुजणे, नाकातून पाणी गळणे, वजन कमी होणे, दूध देणे बंद करणे ही लक्षणे आढळल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले.